औरंगाबाद : जिल्ह्यातील ६ तालुक्यांमधील सातबारा आॅनलाईन करण्याचे काम रखडल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना सातबारासाठी तलाठ्यांकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. सातबारा आॅनलाईन करण्याचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करावे, असे आदेश जिल्हा प्रशासनाने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी खुलताबाद, कन्नड, फुलंब्री या ३ तालुक्यांचे सातबारा आॅनलाईन मिळतात. तर औरंगाबाद, गंगापूर, वैजापूर, पैठण, सिल्लोड, सोयगाव या ६ तालुक्यांचे आॅनलाईन सातबारा करण्याचे काम रखडले आहे. त्यातच सेतू सुविधा केंद्राचा करार अद्याप झालेला नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सातबारा आॅनलाईन करण्याच्या कामासाठी समन्वयक म्हणून उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. महसूल प्रशासनाचे कामकाज आॅनलाईन करण्याचा निर्णय झाला असला तरी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हे काम २ वर्षांपासून रखडले आहे. सातबाराच्या नोंदी आॅनलाईन करण्यासाठी प्रशासनाने उपविभागीय अधिकाऱ्यांना वर्षभरापूर्वी सूचना दिल्या होत्या. आॅनलाईन करण्याचे काम तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात होऊ शकले नाही. त्यामुळे यावेळी देण्यात आलेल्या आदेशातून काही साध्य होईल का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. तलाठ्यांना सातबारा अपडेट करण्यासाठी सेतू सुविधा केंद्रातून सुविधा दिली होती. दर १५ दिवसांनी तलाठ्यांनी थम्बच्या साह्याने लॉगिंग करून सातबारा अपडेट करण्याचे सांगण्यात आले होते; परंतु संकेतस्थळ सुरू करताना अनेक अडचणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्याने ते काम रेंगाळले. एनआयसीने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरने सातबारा आॅनलाईन केले जात असले तरी त्यांच्याकडे डाटा उपलब्ध नसल्यामुळे हे काम ठप्प झाल्याचे सूत्रांनी सांगितले. २०१३ मधील जुन्या रेकॉर्डनुसार सातबारा मिळत असून, नवीन नोंदीचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. नवीन नोंदी नसल्यामुळे जमीन खरेदी-विक्री व्यवहार करण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. संकेतस्थळ बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारा उतारा घेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे तलाठ्यांकडे जाऊन शेतकऱ्यांना सातबारा मिळवावा लागत आहे. तलाठ्यांकडे अनेक कामे असल्याने त्यांच्याकडे चकरा माराव्या लागत असून, सातबारा उतारा मिळत नसल्याची ओरड होत आहे. खरेदीखताच्या नोंदणीसाठी आॅनलाईन सातबारा स्वीकारला जात नसून तलाठ्यांनी हाताने लिहिलेला सातबारा आणावा लागतो आहे.
‘सातबारा’चे काम रखडले
By admin | Updated: December 15, 2015 00:02 IST