परभणी : शहरातील रायगड कॉर्नर -सुजाता कॉलनी या रस्त्याच्या कामाची डागडुजी करण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीच्या बैठकीत नुकतीच मान्यता देण्यात आली़ मान्यतेनंतर अद्यापपर्यंत संबंधित काम करण्याची वर्कआॅर्डर ठेकेदाराला देण्यात आलेली नाही़ त्यामुळे कामाच्या मंजुरीअभावी या रस्त्याचे काम रखडले आहे़ १५ दिवसांवर उरुस येऊन ठेपला आहे़ त्यामुळे या कामाची परिसरातील नागरिकांना प्रतीक्षा लागली आहे़ शहरातील दर्गा रोड येथे सय्यद शाह तुराबूल हक यांचा उरुस भरतो़ यानिमित्त राज्यभरातून भाविक, व्यापारी मोठ्या प्रमाणावर दाखल होतात़ हा उरुस ३० जानेवारी ते १२ फेब्रुवारी या कालावधीत असतो़ उरुसानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येतात़ यामध्ये उरुसात ये-जा करण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेस व अन्य खाजगी वाहनांसाठी रायगड कॉर्नर ते सुजाता कॉलनी हा रस्ता उपलब्ध करून दिला जातो़ या रस्त्यावर या पंधरा दिवसांत मोठी वर्दळ होते़ गेल्या तीन महिन्यांपासून या रस्त्याची दुरुस्ती करावी, यासाठी या भागातील नगरसेवक, नागरिक मनपाकडे पाठपुरावा करीत आहेत़ प्रत्यक्षात या कामाला मान्यता जानेवारीमध्ये झालेल्या स्थायी समितीच्या सभेत मिळाली़ त्यानंतर १५ दिवसांचा कालावधी लोटला़ अद्यापपर्यंत रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही़ रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत़ त्यामुळे वाहनधारकांना ये-जा करणे कठीण झाले आहे़ यातच रस्त्यावर सर्वत्र धूळ होत असल्याने वाहनधारकांना धुळीतून मार्ग काढावा लागत आहे़ येत्या १५ दिवसानंतर उरुस सुरू होणार आहे़ त्यावेळी हजारो जड वाहने या भागातून ये-जा करतील़ या वाहनांची संख्या लक्षात घेता रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करणे, गरजेचे आहे़ प्रत्यक्षात मनपाच्या वतीने हे काम आतापर्यंत पूर्ण होणे गरजेचे होते़ परंतु, या कामाची निविदा व वर्कआॅर्डर वार्षिक ठेकेदाराला अद्यापपर्यंत देण्यात आलेली नाही़ त्यामुळे हे काम रखडले आहे़ काम त्वरीत व्हावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे़ (प्रतिनिधी)
वर्क आॅर्डरअभावी रखडले रस्त्याचे काम
By admin | Updated: January 14, 2016 23:25 IST