लातूर : लातूर जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सभापतीची शनिवारी विशेष सभेत बिनविरोध निवड करण्यात आली आहे़ बांधकाम सभापतीपदी सपना घुगे, महिला व बालकल्याण सभापतीपदी सुलोचना बिदादा, समाजकल्याण सभापतीपदी वेणूताई गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर आरोग्य व बांधकाम सभापती असलेले कल्याण पाटील यांना आता कृषी व पशूसंवर्धन सभापतीपद देण्यात आले आहे़ यावेळी प्रथमच तीन विशेष समित्यांच्या सभापतीपदी महिला विराजमान झाल्याने महिलांची सरशी झाली आहे़जिल्हा परिषदेच्या विशेष समितीच्या सभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम ठरल्यानुसार शनिवारी सकाळी ११ ते १ या वेळेत जि़प़ सदस्यांनी विशेष समिती सभापती पदाचे नामनिर्देशन पत्र दाखल केले़ ३ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते़ ३ ते ३़२० पर्यंत़ अर्जाची छाननी करण्यात आली त्यानंतर १५ मिनिटे ही वेळ नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी देण्यात आली होती़ भाजपाच्या वतीने समाजकल्याण सभापती पदासाठी ललीता हानवते तर काँग्रेसच्या वेणूताई गायकवाड यांनी अर्ज दाखल केले होते़ भाजपाच्या ललीता हानवते यांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतल्याने वेणूताई गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ तर महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी विरोधी पक्षाकडून संगीता सोळुंके तर काँगे्रसच्या वेणूताई गायकवाड, सुलोचना बिदादा यांचे दोन नामनिर्देशन पत्र दाखल केले होते़ चारही नामनिर्देशपत्र वैध ठरले होते़ यात वेणूताई गायकवाड व संगीता साळूंके यांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतल्याने सुलोचना बिदादा यांची सभापती पदी बिनविरोध निवड झाली़ तर अन्य दोन विषय समित्यांसाठी कॉंग्रेसचे कल्याण पाटील, सपना घुगे यांनी दोन नामनिर्देशन पत्र दाखल केले़ भाजपाच्या वतीने रामचंद्र तिरुके, राष्ट्रवादीचे चंदन नागरगोजे, भाजपचे श्रीनिवास मदने यांनी नामनिर्देशपत्र दाखल केले होते़ यात रामचंद्र तिरूके, चंदन नागरगोजे, श्रीनिवास मदने यांनी माघार घेतल्यामुळे कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी कल्याण पाटील तर बांधकाम सभापती सपना घुगे यांची निवड बिनविरोध झाली़ निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनंत गव्हाणे यांनी काम पाहिले़ यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रतिभाताई पाटील कव्हेकर, उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील, माजी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, उपाध्यक्ष अशोकराव पाटील निलंगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे आदींची उपस्थिती होते़ जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती निवडीसाठी आयोजित सर्वसाधारण सभेत ५८ पैकी ७ जि़प़सदस्यांची अनुपस्थिती होती़ विशेष म्हणजे, सभेची नोटीस दहा दिवसांपूर्वीच सदस्यांना देण्यात आली होती़ अनुपस्थित राहिलेल्या सदस्यांमध्ये काँग्रेसच्याही सदस्यांचा समावेश आहे़ त्यामुळे त्यांचा रूसवा असल्याची चर्चा जिल्हा परिषद आवारात सुरू होती़ शांताबाई आदावळे, हनुमंत माने, जयश्री तवले, बकुळा चाफे, संजय कदम, ज्योती पाटील, प्रभावती साळूंके यांची अनुपस्थिती होती़ विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असल्याने काही सदस्यांनी बैठकीस दांडी मारली असावी, असाही सूर होता़ जिल्हा परिषदेच्या विशेष सभेसाठी १० पैकी ८ पंचायत समित्यांच्या सभापतींनी दांडी मारली़ रेणापूर व अहमदपूर पंचायत समितीचे सभापती बैठकीस उपस्थित होते़ विषय समिती सभापतींची निवड बिनविरोध झाल्याने अनुपस्थित सभापतींचा विषय फारसा चर्चिला गेला नाही़
‘सभापती’पदांवर महिला राज़़!
By admin | Updated: October 5, 2014 00:48 IST