औरंगाबाद : इंग्लंडहून आलेल्या एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना कोरोना तपासणीचे दोन अहवाल निगेटिव्ह आल्याने मंगळवारी या महिलेस रुग्णालातून सुटी देण्यात आली, तर अन्य एका रुग्णावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, दोन्ही रुग्णांचे ‘एनआयव्ही’कडून अहवाल येण्याची प्रतीक्षा आहे.
शहरातील सेठ नंदलाल धूत हाॅस्पिटलमध्ये या महिलेवर गुरुवारपासून उपचार सुरू होते. इंग्लंडहून परल्यानंतर महिलेची काेरोना चाचणी केली असता तिचा अहवाल सकारात्मक आला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडाली. महिलेच्या स्वॅबची पुणे येथील ‘एनआयव्ही’कडून तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महिलेच्या स्वॅबची पहिली तपासणी घाटीत करण्यात आली होती. हा अहवाल कोरोना सकारात्मक आला होता. त्यानंतर मेट्रोपोलिस प्रयोगशाळेत स्वॅब पाठविण्यात आला होता. हा अहवाल निगेटिव्ह आला. पडताळणीसाठी पुन्हा एकदा घाटीतील प्रयोगशाळेत स्वॅब पाठविण्यात आला. त्याचाही अहवाल निगेटिव्ह आला. दोन अहवाल निगेटिव्ह आल्याने महापालिकेच्या सूचनेनुसार रुग्णाला सुटी देण्यात आली, अशी माहिती रुग्णालयाचे डॉ. हिमांशू गुप्ता यांनी दिली. डॉ. अमोल कुलकर्णी, डॉ. वरुण गवळी यांनी उपचारासाठी प्रयत्न केले.
रुग्ण होम क्वॉरण्टाइन
रुग्णालयातून सुटी झाली असली तरी रुग्णाला होम क्वाॅरण्टाइन करण्यात आले आहे. महापालिकेकडून रुग्णांवर लक्ष ठेवले जाणार आहे. लागोपाठ दोन अहवाल निगेटिव्ह आल्याने या रुग्णाला सुटी देण्यात आली असून, जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णाची प्रकृती स्थिर आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.
अहवालातून कळेल नवा स्ट्रेन की जुनाच
या दोन्ही रुग्णांत कोरोना विषाणूचा नवा प्रकार (स्ट्रेन) आहे की जुनाच विषाणू आहे, हे ‘एनआयव्ही’च्या तपासणी अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.