बाळासाहेब जाधव, लातूरठाणे जिल्ह्यातील विरारच्या धर्तीवर लातूर जिल्ह्यातील अपंग लाभार्थ्यांच्या पुनर्वसनाचे काम सुरू आहे़ मात्र अपंग पुनर्वसनाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या अडीच वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे पुनर्वसनाच्या कामाला खीळ बसली आहे. अपंग पुनर्वसन उपक्रमातून लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ६१६७ अपंगांना लाभ देण्यात आला आहे. परंतु, अपंग पुनर्वसनाचे काम करणाऱ्या जिल्ह्यातील १७ कर्मचाऱ्यांचे गेल्या अडीच वर्षांपासून वेतन रखडले आहे. पुनर्वसनाचे काम करणाऱ्यांवरच पुनर्वसनाची वेळ आली आहे.केंद्र शासनाच्या मदतीने सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विरारसह महाराष्ट्रातील नाशिक, चंद्रपूर, लातूर या तीन केंद्राच्या ठिकाणी अपंगाचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्र उभारण्यात आली़ त्यांनी केलेल्या कार्याचा पाठपुरावा करून तेथील सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात आले़ त्याच धर्तीवर इतर केंद्रातील कर्मचारीही कायम होतील या आशेवर या तीनही केंद्राने काम सुरू केले़ परंतु केंद्र व राज्य शासनाच्या वतीने या केंद्रातील अपंगाचे पुनर्वसन करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे लक्ष दिले नाही़ परिणामी, अल्पावधीतच नाशिक व चंद्रपूर येथील केंद्र बंद पडले. परंतु, लातुरातील केंद्राचे काम आजतागायत सुरू आहे. मात्र या केंद्रातील १७ कर्मचाऱ्यांचे गेल्या अडीच वर्षांपासून वेतन बंद आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. लातूर जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून ३१ हजार ३३३ अपंग लाभार्थ्यांची नोंद जुलै २०१४ अखेर करण्यात आली़ अपंग लाभार्थ्यांच्या तपासणीसाठी विविध शाळा-महाविद्यालयामध्ये १५० शिबिरे घेण्यात आली़ या केंद्राच्या माध्यमातून ४६४ अपंग लाभार्थ्यांना जिल्हा उद्योग केंद्राच्या सहकार्यातून व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले़ ७०० अपंग लाभार्थ्यांचे कर्ज प्रस्ताव सादर करून २८२ लाभार्थ्यांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी महत्वपुर्ण योगदान दिले़ मात्र आता या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. अनुदानही रखडले...केंद्राकडून अपंग पुनर्वसन संस्थेच्या कामासाठी अनुदान येते. परंतु, गेल्या अडीच वर्षांपासून अनुदान बंद आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन नाही. तरीही अपंगाच्या पुनर्वसनाचा लळा असल्याने या कर्मचाऱ्यांचे काम सुरूच आहे. अनुदान मिळताच कर्मचाऱ्यांच्या पगारी सुरळीत सुरू राहतील, असे या केंद्राचे प्रकल्प संचालक बाबुराव सोमवंशी यांनी सांगितले.
वेतन रखडल्याने पुनर्वसनाला खीळ !
By admin | Updated: July 19, 2014 00:41 IST