विशाल सोनटक्के , उस्मानाबादकाँग्रेसला चढ-उतार नवीन नाहीत. एकेकाळी इंदिरा गांधींचाही पराभव झाल्याचे देशाने पाहिले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा काँग्रेस संघर्ष करीत उभी राहिली आणि अल्पावधीतच पक्षाला थंपींग मेजॉरिटी मिळाली. सध्याचा काळ हा काँग्रेससाठी अडचणीचा असला तरी भाजपा सरकारचा कारभार पाहता येणाऱ्या काळात काँग्रेस पुन्हा उभी राहिलेली दिसेल, असा विश्वास व्यक्त करतानाच जिल्ह्यातील पालिकांची लढाई चढाई करूनच जिंकू. तोच आमचा स्वभाव आहे, अशा शब्दांत आ. मधुकरराव चव्हाण यांनी येणाऱ्या काळात काँग्रेस आक्रमक होणार असल्याचे संकेत दिले. जिल्हा बँक शेतकऱ्यांची आहे. या बँकेला सरकारने ताकद देण्याची आवश्यकता असून, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. मग त्यात काही आमचे असतील तरी चालतील. मात्र, बँक वाचवावी. नुसते साप-साप म्हणून भुई धोपटू नये, अशी टिप्पणीही केली. आ. मधुकरराव चव्हाण यांनी शनिवारी खास ‘लोकमत’शी संवाद साधला. १९५७ मध्ये काँग्रेसची सुरूवात झाली. त्यावेळी व्यंकटराव काका नळदुर्गकर, साहेबराव दादा, तुळशीराम पाटील आदींसोबत सायकलवरून पक्षाचा प्रचार केला. त्यावेळी शेकाप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष तुल्यबळ होते. उध्दवरावांच्या नेतृत्वाखाली नरसिंगराव काटीकर शेकापची ताकद वाढवत होते. मात्र, त्यावेळी राजकारणाचे स्वरुप वेगळे होते. मतदारांबरोबरच कार्यकर्ताही शब्द पाळणारा, निष्ठा ठेवणारा होता. १९८४ ला डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात मला निवडणूक लढण्यास सांगण्यात आले. डॉक्टरांच्या हातात त्यावेळी कारखाना होता. मात्र, त्यानंतरही माझा मतदारसंघ नसतानाही कार्यकर्त्यांच्या जिवावर मी निवडणूक लढलो आणि अवघ्या अडीच-तीन हजाराने पराभव झाला. मात्र, पक्षाचे काम सुरूच होते. पं. स. उपसभापती, त्यानंतर सभापती, भूविकास, जिल्हा बँकेचा चेअरमन, १९९४-९५ दरम्यान राज्य बँकेचा अध्यक्ष, मार्केटींग फेडरेशनचा अध्यक्ष आदी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. १९९० ला आमदार म्हणून निवडून आलो. त्यानंतर १९९५ ला पराभव पहावा लागला. मात्र, १९९९ पासून आजपर्यंत सातत्याने या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व करीत आहे. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री म्हणूनही वंचित, कष्टकऱ्यांसाठी मोठे काम करता आले. दुष्काळाच्या प्रश्नावर बोलताना वरवरच्या उपायांऐवजी शासनाने शेतकऱ्यांचे कर्ज आणि वीज बिल माफ करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत जिल्हा बँकेबरोबरच जिल्ह्यातील बंद पडलेल्या कारखान्यांना मदत करण्याची आवश्यकता व्यक्त केली. मराठवाड्याच्या हक्काच्या पाणीप्रश्नाबाबत बोलताना ते म्हणाले की, आता सात टीएमसीचीच भाषा केली जात आहे. मग, २१ टीएमसीच्या नावाने भूमिपूजन केले कसे? या प्रकल्पासाठी तेव्हाच पैसे दिले असते तर आजवर जिल्ह्याला पाणी मिळाले असते. हक्काचे पाणीच कायमस्वरूपी दुष्काळावर उतारा असल्याचे ते म्हणाले. सात टीएमसी लवकर मिळावेत म्हणून आग्रह जरूर धरा. परंतु त्यातून केवळ भूम, परंडा आणि तुळजापूरचा प्रश्न मिटेल. उर्वरित जिल्ह्याचा प्रश्न्न मिटविण्यासाठी २१ टीएमसीचाच मुद्दा लावून धरला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. पावणेतीन टीएमसीमुळे तुळजापूर तालुक्याचे भागू शकते. याद्वारे तालुक्यात साठ-सत्तर लाख एकर जमीन पाण्याखाली येईल. सद्यस्थितीत ८० साठवण तलाव व साडेचारशे पाझर तलाव तालुक्यात आहेत. त्यामुळे उर्वरित कामासाठी ५०० कोटी दिल्यास हा प्रकल्प मार्गी लागू शकतो, असे ते म्हणाले. रामदऱ्यातून पाणी आणण्यासाठी पंपिंग हाऊसचे टेंडर झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
चढाई करूनच पालिकेची लढाई जिंकू
By admin | Updated: July 24, 2016 00:44 IST