‘आंबेडकरी चळवळ संपली आहे... आगामी विधानसभा निवडणुका म्हणजे आंबेडकरी चळवळीची शेवटची लढाई’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड. बाळासाहेब आंबेडकर का म्हणतात, असा सवाल सध्या उपस्थित झाला आहे. भारतासारख्या देशात आता रोजच कोणत्या ना कोणत्या निवडणुका चालूच असतात. किंबहुना हा देशच निवडणुकांचा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे, अशा या देशात निवडणुका येतात... जातात, त्यात हार होते वा जीत होते. अशा वेळी ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ ही भाषा शोभून दिसते. तमाम आंबेडकरी चळवळीची शान वाढविण्याऐवजी, कार्यकर्त्यांचा हौसला बुलंद करण्याऐवजी बाळासाहेब आंबेडकर यांच्यासारखा जाणता, दिग्गज नेता अशी निराशा पदरी का घेत आहे, हा खरा प्रश्न आहे. बाळासाहेब आंबेडकर यांचा पक्ष कोणता, त्याने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काय यश मिळवले किंवा वेळोवेळी होणाऱ्या निवडणुकांमध्ये या पक्षाची ताकद किती, हा प्रश्नही अलाहिदा; पण बाळासाहेब आंबेडकरांची खरी ओळख आहे, ती भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून आणि ही ओळख कुणी पुसून टाकण्याचेही कारण नाही. सारी आंबेडकरी जनता बाळासाहेबांमध्ये बाबासाहेब शोधायला लागते. अशा वेळी विशेषत: आंबेडकरी चळवळीच्या अनुषंगाने बाळासाहेबांकडून होणारी वक्तव्ये अधिक जबाबदारीची व शान वाढविणारी अपेक्षित असतात. नाउमेद करणारी, पराभूत मानसिकतेची व अवसानघातकी वक्तव्ये त्यांनी करू नयेत, असे निळी टोपी घालणाऱ्या दरएक आंबेडकरी माणसाला वाटते. आता याचा विचार स्वत: अॅड. बाळासाहेबांनी केला पाहिजे. कुणीतरी मांडणी करायला लावतेय म्हणूनही अशी वक्तव्ये होता कामा नये. स्वत:चा आतला आवाज काय सांगतोय हे अशावेळी अधिक महत्त्वाचे मानले गेले पाहिजे. अर्थात बाळासाहेबांना अशी अक्कल शिकवण्याची गरज नाही. ते वर्षानुवर्षे राजकारण करताहेत, रिपब्लिकनच्या अन्य कोणत्याही गटापेक्षा त्यांचे राजकारण एककल्ली वाटत असले तरी खऱ्या अर्थाने स्वाभिमानाचे आहे, हे नाकारून चालणार नाही; पण मधूनच खळबळ उडविणारी वक्तव्ये ते करीत असतात. आणि अख्खी आंबेडकरी चळवळ म्हणजे काही सारं राजकारण नाही, ती चळवळ आहे. खऱ्या अर्थाने ती सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक स्वरूपाची आहे. बुद्ध, कबीर, फुले, शाहू आणि बाबासाहेबांच्या विचारांची मोठी तपश्चर्या या चळवळीमध्ये समाविष्ट आहे, अशी ती संपेल, हरेल, पडेल, झडेल असे वाटत नाही. तिच्यात एक दम आहे, तिच्यात एक ताकद आहे. ती ओळखण्याची गरज आहे.
- स.सो.खंडाळकर