मंठा : आघाडी सरकारच्या काळात राज्यात पाणी पुरवठा योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचारामुळे त्या-त्या भागातील जनतेला आजही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. म्हणूनच आगामी हिवाळी अधिवेशनात पाणी पुरवठा योजनांत झालेल्या कामांची श्वेतपत्रिका काढणार असल्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी बुधवारी मंठ्यात जाहीर केले. मंठ्यात जलशुद्धीकरण केंद्र व जलकुंभ बांधकामाच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात शिव प्रतिमा पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे गोपाळराव बोराडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर, कृउबा सभापती संभाजी खंदारे, अजयसिंग, कैलास बोराडे, राजेश मोरे, मुख्याधिकारी कानपुडे आदी उपस्थित होते.पावसाळी अधिवेशन काळात १० अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आल्याचे सांगून लोणीकर म्हणाले की, शिक्षणापेक्षा गुणवत्ता व अनुभव महत्वाचा ठरतो. शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव देऊ. याशिवाय पीक विमा, पीक कर्ज, दुष्काळ निधी, धडक विहीर या योजनांमार्फत मंठा तालुक्यात ६०० कोटी रुपयांचे वाटप केले असून, मंठा येथे आता नगर पंचायतीची निर्मिती झाली असल्याने प्रति व्यक्ति ७० लीटर पाणी देण्याचा आराखडा तयार केल्याची माहिती लोणीकर यांनी दिली. मंठावासियांसाठी १५ कोटी रुपये खर्चाची ही योजना असून, कामात अडचण निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा देत सर्व लोकप्रतिनिधींनी १ गाव दत्तक घेऊन त्याचा विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले. अजयसिंग, गोपाळराव बोराडे, राहुल लोणीकर, कैलास बोराडे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलास बोराडे, अजय अवचार, दौलत शहाणे, संजय गायकवाड, गणेश बोराडे, ज्ञानेश्वर गोडगे, रघुनाथ घनवट, एन. डी. दवणे, विठ्ठल वंजारे, राजेश्वर कऱ्हाळे, अभिजीत कोंदळे, आसाराम काकडे आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
आघाडी सरकारच्या पाणी पुरवठा योजनांची श्वेतपत्रिका काढणार
By admin | Updated: August 7, 2015 01:13 IST