वाळूज महानगर : पतीशी मैत्री असल्याच्या कारणावरून विटावा येथे एका ३१ वर्षीय विधवा महिलेस बेदम मारहाण करणाऱ्या चौघाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शालन रावसाहेब सांगळे (३१) यांच्या पतीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले असून, त्या विटावा गावात मुलगा ज्ञानेश्वर (११) व आई आशाबाई चन्ने यांच्यासह राहतात. त्या कंपनीत काम करून कुटुंबाची उपजीविका भागवितात. त्यांची आठ महिन्यांपूर्वी सुदाम पवार यांच्यासोबत भेट झाली होती. लग्नाच्या अगोदरपासून त्यांची ओळख असल्याने शालन यांनी त्यांची आपबिती सांगितली. त्यानंतर त्यांच्यात अधून-मधून संभाषण होत असे. याची कुणकुण लागताच पवार पती-पत्नीत वाद होऊ लागले. रविवारी सायंकाळी पवार यांची पत्नी विजमाता व मुले सूरज व सचिन हे शालन यांच्या घरी आले व शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. या प्रकरणी चौघाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक चेतन ओगले तपास करीत आहेत.
-----------------------
जोगेश्वरीतून महिला बेपत्ता
वाळूज महानगर : जोगेश्वरीतून ५० वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या सुनेने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली. कोकिळाबाई शिवराम आडे या आधारकार्डवरील पत्ता बदलून येते, असे म्हणून २८ डिसेंबरला रांजणगाव शेणपुंजी येथे निघून गेल्या होत्या. मात्र त्या अद्यापपर्यंत घरी न परतल्यामुळे त्यांची सून अनुषा आडे यांनी सासू कोकिळाबाई या बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.
---------------