औरंगाबाद : शहरातील काही भागांत दोन-तीन दिवसांआड तर काही भागात पाच- सहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे नागरिक पाणीपुरवठ्याच्या दिवशी सर्व कामे बाजूला ठेवून पाण्यासाठी काहीही करायला तयार असल्याचे लोकमत प्रतिनिधीने शहागंज येथील जाधव कुटुंबियांशी साधलेल्या संवादातून लक्षात आले. पाणी भरण्यासाठी कोणी रजा तर काही जण ‘हाफ डे’ घेत आहेत. घरातील लहान व मोठी सर्वच भांडी भरून ठेवत आहेत. जायकवाडीत वीज पुरवठा खंडित, तीन दिवस शहरात पाणी येणार नाही, अशा बातम्या वाचल्यानंतर आता तीन दिवस काय करायचे, असा प्रश्न रहिवाशांसमोर उभा राहिला. कारण चार दिवसांपूर्वी आलेले पाणी दोन दिवसांत संपले होते. हातपंपावरून भरलेले पाणी पाच- सहा हंडेच होते. त्यामुळे पाण्याच्या नियोजनासाठी रजा घेऊन आज घरी पाण्याची वाट बघत आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत पाणी आले नाही. घरात एक हंडाभरही पाणी नाही. पाणी नसल्यामुळे मुलांना आज अंघोळ घातली नाही, असे शहाबाजार येथील रहिवासी संजय सदाशिवराव जाधव यांनी सांगितले. घरात चार मोठे व लहान आठ, असे एकूण बारा जण आहेत. पाणीपुरवठा फक्त अर्धा तास होतो. त्यात सुरुवातीला १० ते १५ मिनिटे घाण पाणी येते. त्यामध्ये पाणीपुरवठा कमी झाला की अडचण होते. घरातील पाणी संपल्यावर घरापासून १५ मिनिटांवर असलेल्या हातपंपावरून पाणी आणावे लागते. परिसरात एकच पंप असल्यामुळे तेथे केव्हाही गर्दी असते. पाण्यासाठी अर्धा ते एक तास रांगेत उभे राहावे लागते तेव्हा दोन हंडे पाणी मिळते. पाणीपुरवठा नियोजनाप्रमाणे होत नसल्यामुळे नागरिकांचे रोजचे नियोजन बिघडते. त्यातून अनेक प्रश्न उभे राहतात. मनपाने वेळापत्रकाप्रमाणे योग्य दाबाने पाणी पुरवावे. यामुळे नागरिकांच्या अडचणी कमी होतील. मनपातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी पाण्याचे नियोजन करून सोडावे, अशी अपेक्षा संजय जाधव यांनी व्यक्त केली. आरोग्य धोक्यातदोन दिवस नळाचे पाणी आणि दोन दिवस बोअर किंवा हातपंपाचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. त्यामुळे घरातील लहान मुले आजारी पडत आहेत. कुटुंबाला पाणी पुरणार कसे? संजय जाधव, त्यांची पत्नी लक्ष्मी व दोन मुले, दोन मुली, असे कुटुंब आहे. विजय जाधव त्यांची पत्नी वैशाली, मुलगा, मुलगी व भावजय माधुरी जाधव आणि त्यांचा एक मुलगा, असे १२ जणाचे कुटुंब आहे. पाण्याच्या दिवशी ९०० ते हजार लिटर पाणी येते. हे पाणी ४ दिवस कसे पुरणार, असा प्रश्न ते करतात.शेजाऱ्यांकडून सहकार्य घरातील पाणी संपल्यावर काही वेळा हातपंपावरही पाणी मिळत नाही. त्यावेळी शेजाऱ्यांच्या बोअरवर पाणी भरावे लागते. शेजाऱ्यांकडून सहकार्य मिळत असल्यामुळे पाण्याची अडचण काही वेळा दूर होते. तीन दिवसांआड ३०० रुपयांत पाण्याचे लहान टँकर विकत घेणे सामान्य नागरिकांना शक्य नाही. पाणीपट्टी भरूनही पाणी नाही महापालिका नागरिकांकडून पाणीपट्टी वसूल करते. त्याप्रमाणे पाणीपुरवठा नियोजित वेळेवर केला पाहिजे. पाणीपट्टी वर्षभराची घेतली जाते, तर पाणीपुरवठा केवळ ८० ते ९० दिवसच केला जातो. सकाळी पाणीपुरवठा केल्यास दिवसभर पाण्याची काळजी राहत नाही. पाणी किती साठवून ठेवायचे? शहागंज परिसरातील शहाबाजार, काचीवाडा भागात चार दिवसांनी एकदा पाणी येते. यामुळे सामान्य कुटुंबांना पाणी किती साठवून ठेवायचे, असा प्रश्न पडतो. १ लिटर पाण्याच्या बाटल्या ते १ हजार लिटर क्षमता असणाऱ्या पाण्याच्या टाक्या भरून ठेवाव्या लागत आहेत. पाणीच येत नसल्याने साठवणूक कशी करावी असा प्रश्न आहे.
पाण्यासाठी कोणाची रजा, तर कोणाचा ‘हाफ डे’
By admin | Updated: June 7, 2014 00:51 IST