दिलीप मिसाळ
गल्ले बोरगाव : राजकारणात कुणी कुणाचा मित्र नसतो, तसा शत्रूही नसतो. गल्ले बोरगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांवरून ते अगदी सिद्ध झाले आहे. गावातील दिग्गजांनी कॉर्नर बैठका व मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून, यंदाची लढाई ही प्रतिष्ठेची आहे. यंदा गावातील निवडणुकीत तरुण वर्गाचा सहभाग वाढलेला आहे, तर पंधरा वर्षांपासून असलेली एकहाती सत्ता यंदा पलटणार का, नव्या युवकांना संधी मिळणार का, या अस्तित्वाच्या लढाईत नेमके कोण बाजी मारणार, हे काळच ठरवेल.
निवडणूक विभागाने ग्रामपंचायत उमेदवारांना चिन्ह वाटप केली आहेत. त्यामुळे गावागावांमध्ये खऱ्या अर्थाने प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. आपल्याच पॅनलचे उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील यासाठी पॅनलप्रमुख रणनीती आखत आहेत. यंदा गल्ले बोरगाव निवडणुकीत गावातील युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. ग्रामपंचायतीवर गेल्या पंधरा वर्षांपासून जगन्नाथ खोसरे आणि शोभा खोसरे यांच्या गटाचे वर्चस्व राहिले आहे. त्यांना निवडणुकीच्या रिंगणातून नामोहरम करण्यासाठी त्यांच्या विरोधात गावातील विशाल खोसरे, दीपक खोसरे, दिलीप बेडवाल, रामदास चंद्रटिके यांच्या पॅनलने कंबर कसलेली दिसून येत आहे.
-----------------
खोसरे विरुद्ध खोसरे लढत असेल रंगतदार
गल्ले बोरगाव ग्रामपंचायत ही १३ सदस्यांची ग्रामपंचायत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून जगन्नाथ खोसरे, शोभा खोसरे यांचेच गावावर वर्चस्व आहे. यंदा मात्र विशाल खोसरे यांच्या गटाने मोठ्या ताकदीने लढाईत उडी घेतली आहे. त्यामुळे पंधरा वर्षांपासूनची सत्ता पालट होण्याची आशा गावकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. एका अर्थाने खाेसरे विरुद्ध खोसरे अशी लढत रंगणार आहे. १३ सदस्यांसाठी निवडणुकीच्या रिंगणात २७ उमेदवार आपले नशीब अजमावीत आहेत.
-------------
ग्रामपंचायतीची सदस्य संख्या- १३
एकूण मतदार- ३,३८४
महिला मतदार- १,६३३
पुरुष मतदार- १,७५१
सर्वांत कमी वयाचा उमेदवार- २४
सर्वांत जास्त वयाचा उमेदवार- ६७