लातूर : महिनाभरापासून उत्सुकता असलेल्या निकालाचा दिवस १६ मे रोजी उजाडणार असून, लातूरचा खासदार कोण, या प्रश्नाचे उत्तर मतदारांना मिळणार आहे. दरम्यान, काँग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सवाची तयारी केली असून, दोघेही विजयाचा दावा करीत आहेत. पण; कोणाचा दावा खरा ठरतो, हे शुक्रवारी १२ ते १ वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे. लातूर राखीव लोकसभा मतदारसंघासाठी १७ एप्रिल रोजी मतदान झाले. तेव्हापासून लातूर लोेकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात चर्चेचे गुºहाळ सुरू आहे. जातीनिहाय मतांची आकडेमोड करून तर्कवितर्क लावले जात होते. कोणी भाजपाला, तर कोणी काँग्रेस उमेदवारांच्या पारड्यात केलेली आकडेमोड टाकत होते. ही अंदाज बांधण्याची प्रक्रिया १७ एप्रिलपासून सुरू आहे. या मतदारसंघात एकूण १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु, भाजप, काँग्रेसच्या उमेदवारांतच लढत झाल्याने जय-पराजयाची चर्चा या दोन्ही उमेदवारांबाबतच आहे. एकूण १० लाख ५४ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. जवळपास ६२ टक्के मतदान झाले आहे. मतदारसंघातील समाजाच्या टक्केवारीनुसार गणिते बांधली जात होती. समाजनिहाय मतांचे वर्गीकरण करून विजयी उमेदवाराचा अंदाज कालपर्यंत बांधला जात होता. तर काँग्रेस, भाजपचे कार्यकर्ते आपलाच उमेदवार कसा विजयी होईल, याचे विश्लेषण गेल्या महिनाभरापासून करीत आहेत. आता निकालाचा दिवस उजाडला आहे. भाजपचे सुनील गायकवाड की काँग्रेसचे दत्तात्रय बनसोडे या दोन नावांपैकी एक नाव मतांची आघाडी घेणार आहे आणि त्यातून लातूरचा खासदार समजणार आहे. भाजप, काँग्रेस कार्यकर्त्यांना आपल्या उमेदवाराच्या विजयाचा विश्वास आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष कार्यकर्त्यांनी विजयोत्सवाची तयारी केली आहे. पण फटाके कोणाचे फुटतात आणि कोणाचे नाही, हे मतदान यंत्रातील मतदान उद्या बाहेर आल्यानंतर कळेल. पण सध्या तरी दोन्ही पक्ष कार्यकर्त्यांनी विजयोत्सवाची जय्यत तयारी केली आहे. एका उमेदवाराच्या उत्साही कार्यकर्त्याने ५ लाखांचे फटाके घेऊन ठेवले आहेत. शुक्रवारी सकाळी पहिला राऊंड होताच याच्यातील पहिली माळ फोडू, असा विश्वासही त्या कार्यकर्त्यास आहे. (प्रतिनिधी) सकाळी ८ वाजता मतमोजणी... बार्शी रोडवरील महिला तंत्रनिकेतनच्या सभागृहात शुक्रवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. मतमोजणीसाठी १४ टेबल असून, प्रतिटेबलवर २५ राऊंड मतमोजणीचे होणार आहेत. या मतमोजणीवर बारकाईने लक्ष राहणार असून, सीसीटीव्ही कॅमेरे, वेब कॅमेर्यांच्या निगराणीखाली ही मतमोजणी होणार आहे. तगडा बंदोबस्त... मतमोजणीसाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावला असून, शस्त्रधारी जवान बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा म्हणून महिला तंत्रनिकेतन परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. ५ नंबर चौकाकडून बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंतचा बार्शी रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक बार्शी रस्त्याच्या समांतर रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. लातूर शहराकडून मुरुडकडे जाणारी वाहने ५ नंबर चौकातून समांतर रस्त्याने मुरुडकडे जातील व मुरुडकडून येणारी वाहने बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयापासून मुख्य बार्शी रस्त्याऐवजी समांतर रस्त्याने ५ नंबर चौकात येतील.
कोण असेल खासदार, गुरुजी की डॉक्टर?
By admin | Updated: May 16, 2014 00:09 IST