औरंगाबाद : पुणे- मुंबईसारखा डौल, रूबाब नसला तरी मराठवाड्याला स्वत:ची अशी स्वतंत्र सांस्कृतिक परंपरा आहे. पण सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मागील काही वर्षांपासून औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्याच्याच नाट्यगृहांना लागलेले ग्रहण आणि त्यात कोरोनाची पडलेली भर आता मराठवाडी रसिक आणि कला यामध्ये असलेली नाळ तोडू पाहत आहे.
मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील नाट्यगृहांची अवस्था एकसारखी झाली असून कोणत्या शहरातील नाट्यगृह अधिक खराब अशी जणू चढाओढच सुरू झाली आहे. मराठवाड्यात सांस्कृतिक परंपरा आहे, नाट्य चळवळ आहे आणि रसिकही आहेत. पण नाट्यगृहेच चांगल्या दर्जाची नसल्याने आमचा नाईलाज होतो, असे काही कलावंतांनी सांगितले.
मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातील संत तुकाराम नाट्यगृह आणि संत एकनाथ रंग मंदिर दुरुस्तीच्या नावाखाली मागील २ वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे आता नाटकांसाठी केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यगृहाचाच पर्याय उपलब्ध आहे. शहरातील इतर दोन खासगी नाट्यगृहे लहान असल्याने तेथे व्यावसायिक नाटकांचे प्रयोग करणे शक्य नाही. त्यामुळे मागील २ वर्षांपासून औरंगाबादमध्ये नाटके होण्याचे प्रमाण अवघे २५ टक्क्यांवर आले आहे.
चौकट :
अशी झाली आहे दुरावस्था
१. नांदेड- डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाची दुरावस्था झाली असून त्याच्या आधुनिकीकरणासाठी अडीच कोटींची तरतूद केली आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून कामाला प्रारंभ झालेला नाही. पुण्या-मुंबईच्या व्यावसायिक नाटकांचे वर्षभरात पंधरा ते वीस प्रयोग होतात.
२. जालना- ३५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले आणि त्याकाळी मराठवाड्यातील सर्वात अद्ययावत म्हणून ओळख असलेल्या कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहाची आज दुरावस्था झाली असून मागील १० वर्षांपासून एकही व्यावसायिक नाटक शहरात आलेले नाही.
३. उस्मानाबाद : कळंब, भूम व उस्मानाबाद शहरात पालिकेची नाट्यगृहे आहेत. यातील कळंब येथील नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे तर भूम येथील नाट्यगृहाचे नूतनीकरण सुरू आहे. उस्मानाबाद शहरात पालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाचे काम निधीअभावी रखडले आहे. मागील दोन वर्षात जिल्ह्यात व्यावसायिक नाटकांचे प्रयोग झाले नाहीत.
४. परभणी : सांस्कृतिक चळवळीचे केंद्रबिंदू असणारे नटराज नाट्यगृह दुरावस्थेमुळे मागील ५ वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे याकाळात एकही व्यावसायिक नाटक झालेले नाही. सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परभणीला रंगमंच नसणे म्हणजे परभणीचे सांस्कृतिक चैतन्य हरविल्यासारखे आहे.
५. बीड : यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची आसनव्यवस्था, ध्वनी व्यवस्था, शीतकरण यंत्रणा नादुरुस्त आहे. वर्षभरात शहरात केवळ ८ ते १० व्यावसायिक नाटकांचे प्रयोग होतात. शहरात दुसरे सुसज्ज नाट्यगृह व्हावे, अशी अपेक्षा रंगकर्मी करत आहेत.
प्रतिक्रीया-
१. गुढीपाडव्याचा तरी मुहूर्त गाठावा
नाट्यगृहांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करून रसिक आणि कलाकार आता थकले आहेत. त्यामुळे आता प्रशासनाने लक्ष घालावे आणि निदान गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तरी औरंगाबादची नाट्यगृहे सुरू करावीत. कोकणातल्या अगदी लहान तालुक्यांमध्येही आम्ही नाट्यप्रयोग करत आहोत. नाट्यगृहे चांगली असली तर नाटके आणि कलावंत नक्कीच मराठवाड्यात येण्यास उत्सुक असतील.
- चंद्रकांत कुलकर्णी, दिग्दर्शक
२. नाट्यगृहे कोणासाठी?
मराठवाड्यातील नाट्यचळवळ अजिबात थंड झालेली नाही. प्रश्न आहे तो नाट्यगृहांचा. मुळात नाट्यगृहे ही राजकारण्यांसाठी असतात की कलावंतांसाठी हाच आपल्याकडचा न सुटलेला प्रश्न आहे. नाट्यगृहे सवलतीत कोणाला मिळतात, हे आता उघड आहे. याविषयीचा मागील १० वर्षातला प्रामाणिक हिशेब मांडला तर दुरावस्था नेमकी का झाली, याची कारणे कळतील.
- अरविंद जगताप, लेखक
३. प्रशासनाचे दुर्लक्ष
नांदेड शहराचे वैभव असलेल्या शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाच्या आधुनिकीकरणाची नितांत गरज आहे. यासंदर्भात महापालिकेकडे अनेकदा पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत आहे.
- दिनेश कवडे, रंगकर्मी, नांदेड.
४. .. तर दर्जेदार नाटके येतील
जालना जिल्हा नाट्य आणि संगीताचा चाहता म्हणून ओळखला जायचा. परंतु गेल्या ५- १० वर्षांपासून शहरातील नाट्यगृहाची दुरावस्था झाली आहे. फुलंब्रीकर नाट्यगृह चांगले झाल्यास पुणे, मुंबईची अनेक दर्जेदार नाटके जालनेकरांना पहावयास मिळतील.
सुंदर कुंवरपुरिया, अध्यक्ष, नाट्यांकुर संस्था