जळकोट : अर्धा पावसाळा संपत आला तरी अद्यापही दमदार पाऊस झाला नसल्याने नदी, नाले, तळे कोरडेठाक पडले आहेत़ परिणामी शेतकरी, पशूपालकांच्या डोळ्यांत पाणी उभारले आहे़ दुष्काळी परिस्थितीच्या संकटाचा सामना कसा करायचा? असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे़जळकोट तालुका हा डोंगरी माळरानाचा आहे़ त्यामुळे तालुक्यातील शेती ही पावसावरच अवलंबून आहे़ गेल्या काही वर्षांत तलावांची संख्या वाढली असली तरी पावसाचे प्रमाण मात्र दरवर्षी कमी झालेले आहे़ परिणामी तालुक्यात पाण्याचा प्रश्न कायम गंभीर राहिला आहे़ यंदाच्या पावसाळ्यास सुरुवात होऊन दीड महिना होत आहे़ मृग, आर्द्रा या दोन्ही नक्षत्रांनी हुलकावणी दिली़ त्यानंतरच्या पुनर्वसू नक्षत्रात अल्प पाऊस झाला़ काही शेतकऱ्यांनी घरातील किडूक- मिडूक विकून बी- बियाणे, खते खरेदी केली़ त्यापैकी काही शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरली़ परंतु, त्यानंतर पावसाने उघडीप दिली़ त्यामुळे उगवलेली पिके वाळून गेली आहेत़ पाऊसच नसल्याने तालुक्यात वाळवंटासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे या परिस्थितीचा सामना कसा करावा असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर व पशूपालकांसमोर उभा राहिला आहे़ तालुक्यात सिंचनाचे क्षेत्र कमी असल्याने पशूपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे़ पाऊस नसल्याने शेतकरी व पशूपालक संकटात सापडले आहेत़ त्यामुळे शासनाने मदत द्यावी, अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून होत आहे़(वार्ताहर)संकटावर मात करायची कशी ?पावसाच्या आशेवर होकर्णा व वांजरखेडा शिवारात आम्ही कर्ज काढून मे महिन्यात कापसाची लावण केली आहे़ पावसाने गुंगारा दिल्याने बहरलेले पीक कोमेजून जात आहे़ येत्या पाच- सहा दिवसांत पाऊस झाल्यास नुकसान टळणार आहे़ अन्यथा मोठ्या संकटाला समोरे जावे लागणार आहे, अशी भावना माधव भुरे या शेतकऱ्याने व्यक्त केली़ तालुक्यातील ४७ गावांतील परिस्थिती पावसाअभावी भयावह झाली आहे़ पशूधनाच्या चारा- पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़ त्यामुळे पशूपालक तर आकाशाकडे पाहून पावसाची याचना करीत आहेत़
विहिरी, तळे आटले; आले डोळ्यांत पाणी!
By admin | Updated: July 28, 2014 00:54 IST