शर्मिष्ठा भोसले, औरंगाबादतरुण पिढीमध्ये वाचनसंस्कृती नाही अशी चर्चा नेहमीच केली जात असताना महाविद्यालयीन तरुण मात्र कायमच सकस आणि दर्जेदार साहित्याच्या शोधात असल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. एकाच वेळी चेतन भगत आणि वि. स. खांडेकरांनाही या तरुणांनी आपली पसंती दर्शवली आहे. नव्या कोऱ्या पुस्तकांच्या गंधाहून मोबाईल, संगणक अशा गॅझेटस्चेच आकर्षण तरुण पिढीला जास्त असल्याचे बोलले जाते; मात्र महाविद्यालयीन तरुण पिढी त्यांच्या भाषेत, त्यांचे जगणे मांडणाऱ्या नवलेखकांसह अभिजात मराठी साहित्यिकांचे लिखाणही आवर्जून वाचते आहे. नव्या लेखकांमध्ये चेतन भगत यांच्याकडे तरुणांचा ओढा सर्वाधिक आहे. त्यांचे नवे पुस्तक कधी येईल याची वाट पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले. यासह जुन्या लेखकांमध्ये वि. स. खांडेकर, व. पु. काळे, पु. ल. देशपांडे, शिवाजी सावंत, रणजित देसाई या लेखकांची मोहिनीही नव्या पिढीवर कायम आहे. ‘ययाती’, ‘छावा’, ‘पार्टनर’, ‘बटाट्याची चाळ’ ही पुस्तके आवडल्याचे बहुतांश तरुणांनी सांगितले. शहरात वा तालुक्याच्या ठिकाणी हवी ती पुस्तके उपलब्ध होत नसल्याची खंत मात्र अनेक तरुणांनी बोलून दाखवली. कवितांना मात्र तरुणांनी कथा व कादंबऱ्यांच्या तुलनेत कमीच पसंती दिली आहे.
आम्ही वाचतोच; फक्त माध्यमे बदललीत!
By admin | Updated: December 13, 2014 00:29 IST