जालना : येथील एमआयडीसीतील उद्योग-धंद्यांना नगर पालिका प्रशासनाने पाण्याचा पुरवठा करण्यास संमती दर्शविली आहे. दरम्यान, एमआयडीसीस मिळणाऱ्या पाण्याची व्यवस्था होईपर्यंत पालिका प्रशासन पाणी पुरवेल, अशी माहिती शासकीय सूत्रांनी दिली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा उद्योग मित्र समिती, सल्लागार समिती, आजारी उद्योग पुनर्वसन समितीची संयुक्त बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली. त्यातून औद्योगिक वसाहतीत पाण्याचा मुद्दा चर्चेत आला. विशेषत: उद्योजकांनी तो विषय सरकारी पातळीवरून तात्काळ मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. एमआयडीसीतर्फे मिळणाऱ्या पाण्याची सोय होण्यास अवधी असल्याने सध्या पालिका उद्योजकांना पाणीपुरवठा करण्यास तयार आहे. या बाबत वरिष्ठ कार्यालयास पत्रव्यवहार करून मार्ग काढण्यात येईल, असे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.पोलिस चौकी सुरू करण्यासाठी एमआयडीसीने २००० चौ.मी. भूखंड उपलब्ध करून दिला आहे. परंतू तेथे अद्याप चौकी सुरू झाली नसल्याची खंत उद्योजकांनी व्यक्त केली. त्यावर जिल्हा प्रशासनातर्फे पाठपुरावा केला जाईल, असे सांगण्यात आले. औद्योगिक क्षेत्र टप्पा एक व दोनमध्ये ट्रक टर्मिनलचे बांधकाम करण्यासाठी अतिरिक्त जालना औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक - दोन मधील वाहनतळासाठी राखीव असलेला भूखंड विकसित करण्यासाठी उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. औद्योगिक क्षेत्रात उद्योजकांनी झाडे लावावेत, त्यामुळे प्रदूषण कमी होईल, असे सांगितले होते. परंतू उद्योजकांनी प्रतिसाद दिला नसल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. जेईएस कॉलेज ते पाण्याची टाकी हा जुना औद्योगिक वसाहतीतील रस्त्याचे काम परिषदेने उत्तम प्रकारे केल्याबद्दल नगर पालिकेचे अभिनंदन करण्यात आले. (प्रतिनिधी)मंठ्यात होणार चर्म व्यवसाय क्लस्टर मंठा येथे चर्मव्यवसायाला गती देण्यासाठी तेथील व्यवसायिक उत्सुक असून तेथे दहा जणांनी स्वत:च्या इमारतीत क्लस्टर विकसीत करण्याची मागणी केली आहे. तेथे क्लस्टर विकसित करता येईल. या दहा जणांना एक उद्योग म्हणून एकत्र काम करावे लागेल. दहा टक्के स्वत:चा वाटा उचलावा लागेल असे महाव्यवस्थापक सोन्ने यांनी सांगितले त्यास उपस्थितांनी सहमती दर्शविली.
पालिका देणार एमआयडीसीला पाणी
By admin | Updated: June 20, 2014 00:47 IST