कडा: आष्टी तालुक्यातील सावरगाव तलावात जेमतेम पाणी आहे. हे पाणी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित केले आहे. असे असले तरी काही शेतकरी रात्रंदिवस तलावातील पाणी उपसा करीत आहेत. गांभिर्याची बाब म्हणजे संबंधित प्रकाराकडे पाटबंधारे विभागाचेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आगामी काळात पाणीटंचाईवर मात कशी करावी असा प्रश्न उभा ठाकला आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई आष्टी तालुक्यात आहे. दरवर्षी आष्टी तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाणीटंचाई ग्रामस्थांच्या पाचवीला पुजलेली असते. सध्याही आष्टी तालुक्यात २०० पेक्षा अधिक टँकरने जवळपास दीडशे गावे व दोनशे वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. आष्टी तालुक्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई गंभीर स्वरूप धारण करीत असल्याने तालुक्यातील तलावातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. यामुळे तलावातून शेतीसह इतर कारणासाठी होणारा पाणी उपसा पूर्णत: बंद केला आहे. असे असले तरी सावरगाव येथील साठवण तलावातून दिवसाढवळ्या विद्युत पंपाने पाणी उपसा होत असल्याने इतर ग्रामस्थातून नाराजी व्यक्त केली जात आहे.सावरगाव येथील साठवण तलावातून पाणीटंचाईच्या काळात शेडगेवाडी, शिंदेवाडी, सावरगाव यासह इतर गावांना पाणीपुरवठा केला जातो. या परिसरात पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांच्या विहिरी, कुपनलिकांनीही तळ गाठला आहे. अशावेळी जनावरांना पाणी पाजण्यासाठीही शेतकरी सावरगाव तलावावर जातात. मात्र या तलावातील पाणी पातळी अवैध पाणी उपशाने घटू लागली आहे. त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भिती शेतकऱ्यांमधून व्यक्त होऊ लागली आहे.सावरगाव तलावात असलेले पाणी सध्या काही शेतकरी विनापरवाना शेती पिकांसाठी उपसा करीत आहेत. अशा शेतकऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही तहसीलदारांकडे तब्बल पंधरा दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी केली आहे. या तलावातून पाणीउपसा करू नये यासाठी शिंदेवाडी, शेडगेवाडी, सावरगाव येथे दवंडीही पिटविण्यात आली आहे. असे असले तरी या सर्व बाबी धुडकावून काही शेतकरी अनधिकृतपणे पाणी उपसा करीत असल्याने आगामी काळात पिण्यासाठीही पाणी मिळते का नाही असा प्रश्न बाबासाहेब मस्के यांनी उपस्थित केला आहे. सावरगाव, शिंदेवाडी सह परिसरातील पाच हजार लोकांना टंचाईच्या काळात या तलावातून पिण्याचे पाणी पुरविले जाते. यामुळे या तलावातील अवैध पाणी उपसा तात्काळ थांबवावा, नसता आंदोलन करू, असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे. या संदर्भात तहसीलदार राजू शिंदे म्हणाले की, सावरगाव येथील तलावाची पाहणी करून अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारी जप्त करण्यात येतील, अशा लोकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही तहसीलदारांनी दिला. विना परवाना पाणी उपशावर कारवाईची मागणी आष्टी तालुक्यात पाणीटंचाई असल्याने तलावातील पाणी केले आहे आरक्षितसावरगाव येथील तलावातील आरक्षित पाण्याचाही शेतकऱ्यांकडून उपसाविद्युत पंपाने पाणी उपसा करून फुलविली शेती
सावरगाव तलावातून विद्युतपंपाने पाणी उपसा
By admin | Updated: July 4, 2014 00:13 IST