औरंगाबाद : महापालिकेतील पाणीपुरवठ्याच्या यंत्रणेमुळे शहरातील पाणीपुरवठ्याची घडी विस्कटलेलीच आहे. सिडको-हडकोतील वेळापत्रक हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच शहरातील वेळापत्रक बिघडले आहे. गजानन महाराज मंदिर, कडा परिसरात आज पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागली. महावितरणचा विजेचा लपंडाव, टँकरची वाढती संख्या, अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. पाणीपुरवठ्याबाबत नगरसेवकांच्या तक्रारी वाढत असून, दोन महिन्यांपासून सिडको-हडकोसह शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडलेले आहे. गेल्या आठवड्यात सिडको-हडकोतील नगरसेवक एन-५ येथील जलकुंभ परिसरात ठाण मांडून होते. ४५ मिनिटांवरून १५ मिनिटांवर पाणीपुरवठा आल्यामुळे नगरसेवकांनी उपमहापौरांच्या दालनात बैठकही घेतली. पाण्याच्या वितरणाकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वैशाख महिना सुरू झाला आहे. त्यामुळे तापमानामध्ये वाढ होत आहे. परिणामी पाण्याची मागणी वाढत आहे. महावितरणकडून वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे मनपाचे नियोजन कोलमडल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, असे मनपाचे मत आहे. काही दिवसांपासून गजानन कॉलनी भागामध्ये पाणीपुरवठा होत नाही. जवाहर कॉलनी, शिवशंकर कॉलनी, दशमेशनगर, संग्रामनगर, हर्सूल, जटवाडा, सिडको-हडको, एन-४, गारखेडा या परिसरांसह जुन्या शहरातही पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. जायकवाडीतून उपसलेले पाणी जायकवाडीतील डाव्या कालव्यालगत असलेल्या मनपाच्या जलउपसा केंद्राने ७०० व १४०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिन्यांसाठी ८ पंपांच्या मदतीने पाणी उपसले जाते. जानेवारीमध्ये सरासरी १५० एमएलडी पाणी घेतले जात होते. एप्रिलमध्ये १५६ एमएलडी पाणी घेतले. मेमध्ये १५६ एमएलडी पाणी उपसले जात आहे. जानेवारीत १५० एमएलडी पाणी उपसले जात असताना शहरात ओरड नव्हती. आज १५६ एमएलडी पाणीपुरवठा होत असतानाही ओरड होत आहे. त्यामुळे कुठेतरी पाणी मुरत असल्याचा संशय आहे.
पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकाची घडी अद्यापही विस्कटलेलीच
By admin | Updated: May 8, 2014 00:19 IST