लक्ष्मण कांबळे , पेठसांगवीउमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथील प्रथमश्रेणी पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये मागील ७ महिन्यांपासून डॉक्टरच नाहीत. त्यामुळे या दवाखान्यांतर्गत येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.जनावरांना वेळेवर उपचार मिळावेत व खाजगी डॉक्टरांकडून लुबाडणूक थांबावी, या उद्देशाने ग्रामीण भागात पशुवैद्यकीय दवाखाने सुरु करण्यात आले आहेत. मागील दोन वर्षामध्ये अशा दवाखान्याच्या इमारतीवर कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. दवाखाने सुसज्ज बनले आहेत. मात्र अनेक ठिकाणी डॉक्टरांची वानवा आहे. असाच प्रकार नाईचाकूर येथील प्रथमश्रेणी पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बाबतीत येत आहे.या पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत सावळसूर, माडज, बोरी, वागदरी, मातोळा, चिरेवाडी, भगतवाडी, नाईचाकूर आणि कोळेवाडी ही नऊ गावे येतात. या गावांतर्गत पशुधनांची संख्याही मोठी आहे. शेतकऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेवूनच या पशुवैद्यकीय दवाखान्याची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र आजघडीला डॉक्टरांअभावी हा दवाखाना शोभेची वस्तू बनला आहे. डॉक्टर भोरे हे २ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाले. तेंव्हापासून ते आजतागायत कायमस्वरुपी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. पशुपालकांतून ओरड होवू लागल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने याठिकाणचा कार्यभार उमरगा येथील तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.बिराजदार यांच्याकडे सोपविला. मात्र तरीही गैरसोय थांबत नव्हती. त्यावर मुरुम येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर खरोसेकर यांच्याकडे कार्यभार देण्यात आला आहे. मात्र तेही नियमितपणे उपस्थित नसतात, असे पशुपालक शेतकऱ्यांतून सांगण्यात येत आहे.नाईचाकूर येथे एकही डॉक्टर नाही. त्यामुळे येथील पद्भार मुरुम पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ. खरोसेकर यांच्याकडे देण्यात आला आहे. या दोन्ही दवाखान्यातील अंतराचा विचार केला असता ते ३० किमीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे डॉ. नाईचाकूर येथे नियमितपणे उपस्थित राहत नाहीत, असे सांगण्यात येत आहे.नाईचाकूर दवाखान्यांतर्गत येणाऱ्या ९ गावांमध्ये जनावरांची संख्या मोठी आहे. असे असतानाही मागील सहा ते सात महिन्यांपासून याठिकाणी कायमस्वरुपी डॉक्टर नाही. त्यामुळे पशुपालकांची फरफट सुरु आहे. ही बाब लक्षात घेवून प्रशासनाने तात्काळ डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी मागणी रुकमंगल पवार यांनी केली आहे.
पशुवैद्यकीय दवाखाना सात महिन्यांपासून वाऱ्यावर
By admin | Updated: September 18, 2014 00:39 IST