गजेंद्र देशमुख , जालनाकाही दिवसांपासून पडणारी कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे पालेभाज्या कमालीच्या स्वस्त झाल्या असून फळभाज्या मात्र महाग झाल्या आहेत. जिल्ह्यासह शहरात परजिल्ह्यातून भाज्यांची आवक होते. कृषी उत्पन्न बाजार समिती, महात्मा फुले मंडईत शहराचे भाजी मार्केट आहे. दिवसाकाठी येथे पालेभाजी व फळभाजी मिळून दोनशे ते तीनेश क्विंटलची आवक होत असते. मात्र, काही दिवसांपासून भाजीपाल्याच्या भावात मोठी तफावत जाणवत आहे. रविवारच्या आठवडी बाजारात पालक, मेथी, शेपू, करडई आदी पालेभाज्यांचे भाव एक महिन्यांपूर्वी तीन ते चार रुपये प्रति जुडी भाव होते. दोन आठवड्यांपासून मेथी अथवा पालकाची प्रति जुडी एक रुपया तसेच त्याही पेक्षा कमी भावात मिळत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेला हायसे वाटत असले तरी उत्पादक मात्र चांगलेच धास्तावले आहेत. रविवारच्या आठवडी बाजारात ही स्थिती प्रकर्षाने दिसून येते. मेथी तसेच पालक जुडी पाच रुपयांच्या पाच अथवा सहा जुड्या मिळत आहेत. करडई, शेपू या भाज्यांची स्थिती अशीच आहे. याउलट फळभाज्यांचे दर चढे आहेत. गवार, भेंडी, वटाणा, वांगे, कारले, दोडके, सिमला मिरची या भाज्या ४० ते ५० रुपये प्रति किलो आहेत. तर बटाटे प्रतनुसार २० ते ३० रुपये किलोच्या दरम्यान आहेत. दाट धुके व अतिथंडीमुळे फळभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. धुक्यामुळे फळभाज्यांचा फुलोरा गळून पडत आहे. यामुळे उत्पादनात घट आल्याने आवक मंदावली आहे. आवक कमी झाल्याने भावही चढ आहेत. प्रत्येक फळभाजी ४० ते ५० रुपये प्रति किलोच्या दरम्यान भाव आहे.
पालेभाज्या झाल्या स्वस्त, फळभाज्या महाग !
By admin | Updated: January 13, 2015 00:11 IST