सिडको एन ७ परिसरातील जागृत दत्त मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देताना गणेश जोशी यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी भगवान दत्तात्रयाच्या मूर्तीला जलाभिषेक होईल. त्यानंतर दुपारी १२ वाजता मध्यान्हाची आरती होणार असून सायं. ४ ते ६ यादरम्यान दत्त जन्माचे कीर्तन होईल. सायंकाळी ६ वा. दत्तजन्म होईल. तसेच सोमवारी सायं. ६: ३० ते ७: ३० यावेळेत दत्तात्रयाच्या मूर्तीला ११०० पुष्पांचा पुष्पार्चण सोहळा करण्यात आला. दत्तात्रयाचे मनोहारी रूप पाहून उपस्थित भाविक सुखावले होते.
एन ९ परिसरातील स्वामी समर्थ केंद्र येथे १२: ३९ वा. दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यंदा मात्र सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून केवळ दत्तजन्म आणि सामुहिक पारायण वाचन मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत पार पडतील, अशी माहिती शशी पाटील यांनी दिली.
औरंगपुरा येथील १५० वर्ष जुन्या दत्त मंदिरातही दत्त जन्म सोहळा होणार आहे. सायं. ४ ते ६ या वेळेेत दत्त जन्म कीर्तन आणि त्यानंतर जन्मोत्सव सोहळा होईल. कोरोनामुळे भाविकांनी गर्दी करणे टाळावे आणि नियमांचे पालन करूनच दत्त दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही सर्वच मंदिर संस्थानांकडून करण्यात आले आहे.