औरंगाबाद : नाशिक जिल्ह्यातून गोदावरीच्या पात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे वैजापूर, गंगापूर आणि पैठण तालुक्यांत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून, नदी काठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांनी दिली.नाशिक जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला महापूर आला आहे. गंगापूर धरणातून गोदावरी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असून, नांदूर मधमेश्वर प्रकल्पातूनही नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातून गोदावरी पात्रात सोडण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने वैजापूर, गंगापूर आणि पैठण तालुक्यांतील नदी काठच्या ४० गावांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.गोदावरी नदीत येणारे पाणी तसेच नदीला मिळणाऱ्या छोट्या नद्या, उपनद्या व नाल्यांच्या पाण्याचा प्रवाह थांबण्याची शक्यता नाकारता येत नसल्याच्या पार्श्वभूमीवर वरील गावांना पुराचा वेढा पडण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत नागरिक, शेतकऱ्यांनी नदीकाठी जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी पांडे यांनी केले आहे.वैजापूरमधील १७ गावांना धोकावैजापूर : तालुक्यात सोमवार रात्रीपासून संततधार पाऊस सुरूआहे. नाशिक जिल्ह्याच्या धरणांतील पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आल्याने नदी काठच्या १७ गावांत पुराचा धोका वाढला आहे. या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले जात आहे. संततधार पावसामुळे या भागातील धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. शिवूर, गारज, लोणी खुर्द, खंडाळा, बोरसर, लासूरगाव, लाडगाव, नागमठाण व महालगाव या महसूल मंडळात सरासरी ९६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. (पान ५ वर)संपूर्ण जिल्हा ओलाचिंबश्रावणसरी : गंगापूर वगळता सर्व तालुक्यांनी ओलांडली सरासरीऔरंगाबाद : आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत औरंगाबाद तालुक्याने पावसात आघाडी घेतली आहे, तर जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांत गंगापूर वगळता सर्वच ठिकाणी सरासरीच्या आसपास पाऊस झाल्याने ओलेचिंब असे वातावरण झाले आहे. आषाढाची समाप्ती आणि श्रावणाचे आगमन अशा प्रसन्न वातावरणामुळे जिल्ह्यात चैतन्याचे वातावरण आहे. २ आॅगस्ट २०१५ रोजी जिल्ह्यात ०.९ मि.मी. पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा चांगला पाऊस झाला आहे. ७ जूनपासून आजपर्यंत ४६.९० टक्के पावसाची नोंद झाली असून उर्वरित ५८ दिवसांमध्ये जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊ स होण्याचा अंदाज आहे. २ आॅगस्टपर्यंत सरासरीच्या ६ मि.मी. जास्त पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत १९८.७९ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. त्या तुलनेत यंदा ११८ मि.मी. इतका पाऊस झाल्यामुळे मागील पाच वर्षांत पहिल्यांदाच जून, जुलै महिन्याच्या पावसाने सरासरी गाठली आहे. आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांतील पावसामुळे जलाशयांमध्ये चांगले पाणी साठवण होण्याची क्षमता आहे. औरंगाबाद तालुक्यात यंदा सर्वाधिक पाऊस झाला आहे. फुलंब्री, सिल्लोड, वैजापूर तालुक्यांत ५० टक्क्यांपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. गंगापूर आणि पैठणमध्ये कमी पावसाची नोंद झाली आहे. वैजापूर तालुक्यात गोदावरी नदी काठावर १७ गावे येतात. यापैकी १० गावांतील शेतवस्ती व सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. गंगापूर व पैठण तालुक्यातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.- निधी पांडे, जिल्हाधिकारीनैसर्गिक आपत्तीची संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी तिन्ही तालुक्यांसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करण्यात आली आहे. ४वैजापूर तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, गंगापूर तालुक्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी संजीव जाधवर, तर पैठण तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.वैजापूर, गंगापूर आणि पैठण तालुक्यांतील सर्व प्रशासकीय प्रमुख, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जि.प.च्या अधिकाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
वैजापूर, गंगापूर, पैठणला ‘हाय अलर्ट’
By admin | Updated: August 3, 2016 00:18 IST