परभणी: राज्यातील शिवसेना-भाजपाची २५ वर्षांची युती तुटल्याने व काँग्रेस- राष्ट्रवादीची १५ वर्षांची आघाडी बिघडल्याने जिल्ह्याच्या राजकारणात उमेदवारीवरुन उलथा-पालथ होणार आहे. शिवसेना- भाजपाची युती व काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी यामध्ये फुट पडेल, असे महिनाभरापूर्वी कोणालाही वाटले नव्हते. एवढेच काय गेल्या आठवडाभरापासून यावर चर्चा रतिब सुरु होता. तरीही फुटीची शक्यता चारही पक्षातील कार्यकर्त्यांना वाटत नव्हती. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून महायुतीमध्ये झालेल्या घडामोडीनंतर गुरुवारी महायुती तुटल्याची घोषणा झाली. त्यानंतर काही वेळातच काँग्रेस- राष्ट्रवादीचीही आघाडी संपुष्टात आली. त्यामुळे जिल्ह्यात तळ्या-मळ्यात असलेले विविध पक्षातील नेत्यांना आता स्पर्धक पक्षाचे बॅनर मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील काही नेते त्यांच्या राजकीय पक्षात नाईलाजाने होते. त्यांना आता आधार मिळणार आहे. तर काही नेत्यांना निवडणूक लढविण्याची इच्छा होती. परंतु, आघाडी- महायुतीतील जागा वाटपाने या इच्छेला मुरड घालावी लागली होती. आता मात्र चारही पक्षातील इच्छुक नेते मोकळे झाले आहेत. जेथे काँग्रेसकडे तगडा उमेदवार नाही तेथे अन्य पक्षातील तगडा उमेदवार उमेदवारी मिळवू शकतो. तर जेथे भाजपाकडे उमेदवार नव्हता तेथे अन्य पक्षातील तगडा उमेदवार उभा राहू शकतो. राष्ट्रवादीचीही अशी स्थिती आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा आखाडा आता चांगलाच गाजणार आहे. शुक्रवार व शनिवार हे दोनच दिवस उमेदवारी दाखल करण्याचे आहेत. या दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुकांची उमेदवारी दाखल होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये आता बहुतांश ठिकाणी चौरंगी व पंचरंगी लढती पहावयास मिळणार आहेत. आता होणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या ताकदीपेक्षा उमेदवारांची वैयक्तिक ताकद पहावयास मिळणार आहे. यासाठी पडद्यामागे मोठ्या आर्थिक उलाढालीही होणार आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वाधिक चर्चेची निवडणूक २०१४ ची ठरणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
उमेदवारीवरुन जिल्ह्याच्या राजकारणात होणार उलथा-पालथ
By admin | Updated: September 26, 2014 00:45 IST