वॉशिंग्टन : इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाला पाठिंबा देणाऱ्या चीन व रशियाच्या चार कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. विदेशमंत्री माईक पॉम्पिओ यांनी ही माहिती दिली.
याबाबत घोषणा करताना पॉम्पिओ यांनी म्हटले आहे की, इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम हा अण्वस्त्र प्रसाराबाबत चिंतेचा विषय बनला आहे. या घडामोडींमुळे आता इराणच्या विरुद्धही कठोर पावले उचलण्यात येणार आहेत. इराणला त्याच्या क्षेपणास्त्र क्षमतांमध्ये वाढ करण्यापासून रोखण्यासाठी आम्ही सर्व उपाययोजनांचा वापर करू.
अमेरिकेने ज्या कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत त्यात चीनच्या चेंगदू बेस्ट न्यू मटेरियल्स कंपनी लिमिटेड व जिबो एलिम ट्रेड कंपनी लिमिटेड व रशियाची निल्को ग्रुप व नील फाम खजार कंपनी, तसेच सांटर्स होल्डिंग व जॉइंट स्टॉक कंपनी एलेकॉन यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी संवेदनशील तंत्रज्ञान व उपकरणे पुरविली आहेत.
पॉम्पिओ म्हणाले की, इराणचे क्षेपणास्त्र विकासासंबंधी प्रयत्न रोखण्यासाठी आम्ही यापुढेही काम करीत राहू. याचबरोबर चीन, तसेच रशियाच्या कंपन्यांसारख्या विदेशी पुरवठादारांना ओळखून त्यांच्यावर निर्बंधांसाठी अधिकारांचा उपयोग करू. इराणला या निर्बंधांनुसार, अमेरिकी सरकारकडून खरेदी, अमेरिकी सरकारकडून मदत, निर्यातीवर बंदी लावण्यात येईल. ही बंदी दोन वर्षांपर्यंत लागू राहील.