देवगावफाटा : सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी मोठे प्रकल्प उभारणे आता सोपे नाही. त्यामुळे शासनाने जमीन संपादित न करता राज्यात एकाच वेळी साखळी सिमेंट बंधाऱ्याचे होत असलेले लोकार्पण ही निश्चितच समाधानाची बाब आहे. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे मला कोरड्या बंधाऱ्याचे लोकार्पण करावे लागले, अशी खंत पालकमंत्री सुरेश धस यांनी व्यक्त करीत लवकरच पाऊस पडावा, अशी प्रार्थना ईश्वरास केली.जलसंधारण आणि कृषी विभागाच्या वतीने भौतिकदृष्ट्या पूर्ण झालेल्या सेलू तालुक्यातील नागठाणा येथे १४ आॅगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ते बोलत होते. याप्रसंगी आ. रामप्रसाद बोर्डीकर, जिल्हाधिकारी एस.पी. सिंह, जि.प. अध्यक्षा मीनाताई बुधवंत, मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुंबरे, उपविभागीय अधिकारी पी.एस. बोरगावकर, तहसीलदार छडीदार, राकॉँचे प्रदेश सचिव डॉ. संजय रोडगे, प्रभाकर वाघीकर, प्रतापराव सोळंके, जगन्नाथ जाधव, सोपानराव मोगल, लिंबाजी मोगल, कार्यकारी अभियंता सत्तार खान यांची उपस्थिती होती. धस म्हणाले, नजरी आणेवारीवरून दुष्काळी परिस्थितीसमोर आल्याने शासनाने संपूर्ण मराठवाडा टंचाईग्रस्त जाहीर केला. वीज बिलात ३३ टक्के सवलत, विद्यार्थी फी माफीचा निर्णय झाला असून टंचाईत पाणी, चारा याबाबतचे अधिकार तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. येथे १८ टीएमसी पाणी क्षमतेच्या बंधाऱ्यात पाण्याची साठवण झाल्यानंतर कृषी उत्पन्न वाढीसाठी त्याचा उपयोग होईल. परंतु शेतकऱ्यांनी मोटारपंपद्वारे पाणी घेण्याचे धाडस करू नये, दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे म्हणत माझ्या मतदार संघात तीन वर्षापासून दुष्काळ आहे. तरीही शेतकरी फळबागा जगवतात, दररोज २५०० लीटर दूध उत्पादन होते. आ. बोर्डीकरांकडे बघत आपल्या मतदारसंघात दुधाळ जनावरांची संख्या किती आहे, असे म्हणत त्यांंनी फिरकी घेतली. आ. बोर्डीकर आपल्याकडे माझं दुर्लक्ष होत आहे, असे नाही. माझ तर सोडा परंतु सेलू-जिंतूर वरच सर्वांचे लक्ष आहे, असे म्हणत कोपरखळी मारली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपसरपंच चंदू मोगल, तलाठी सी.पी. वाघ, पोलिस पाटील चांदगेव मोगल यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक आबासाहेब मोगल यांनी केले. अमिता वैद्य, गिरीजा पाते यांंनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)
कोरड्या बंधाऱ्याचे लोकार्पण ही दुर्दैवी बाब
By admin | Updated: August 17, 2014 01:54 IST