संजय कुलकर्णी , जालनाडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचे उपकेंद्र जालना येथे स्थापन करण्यास विद्यापीठ सिनेटने मंजुरी दिली. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने जालना सूतगिरणीनजीक ५६ एकर जागा देण्याची तयारीही दर्शविली. मात्र याबाबत शासनाने काढलेल्या खर्चाच्या त्रुटीवरून उपकेंद्राचा प्रस्ताव रखडला आहे.डॉ. बा. आं. म. विद्यापीठ औरंगाबाद येथे पदव्यूत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी जालना जिल्ह्यातून अनेक विद्यार्थी जातात. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना हे शिक्षण येथेच मिळावे, यासाठी विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा.डॉ. शिवाजीराव मदन यांनी जानेवारी २०१४ मध्ये सिनेटमध्ये विद्यापीठचे उपकेंद्र जालना येथे व्हावे, असा ठराव मांडला होता. सिनेटने या ठरावास मंजुरीही दिली. नियोजित उपकेंद्र स्थापन झाल्यास जिल्ह्यातील पदव्यूत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना औरंगाबाद येथे विद्यापिठात जाण्याची गरज नाही. तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी निवासाची व्यवस्थाही उपलब्ध होणार आहे. विद्यापिठाचे उपकेंद्र मराठवाड्यात उस्मानाबाद येथे आहे. जालना व बीड येथील उपकेंद्रास विद्यापिठाकडून मंजुरी मिळालेली आहे. मात्र शासनस्तरावर याबाबतची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शासनाने काढलेल्या खर्चाविषयक त्रुटींची पूर्तता विद्यापिठाने केल्यास या दोन्ही ठिकाणी उपकेंद्र स्थापन होण्याचा मार्ग सुकर होईल. लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासन यांच्याकडून याबाबत सकारात्मक पावले उचलल्यास त्यास गती येईल, अशी चर्चा आहे. विद्यापीठाचे उपकेंद्र जालना येथे स्थापन होण्यासाठी आपण शासन स्तरावर पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करू. गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या शिक्षणाची सोय यानिमित्ताने येथे उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय त्यामुळे दूर होईल. यासाठी आपण आवश्यक सूचना संबंधितांना तातडीने देऊ. यासंदर्भात आपण कुलगुरुंसमवेत चर्चा करणार आहोत.-बबनराव लोणीकर, पालकमंत्री, जालनाउस्मानाबाद येथे ज्याप्रमाणे विद्यापीठाचे उपकेंद्र आहे, त्याच पद्धतीने जालना व बीड येथे उपकेंद्र स्थापन व्हावे, याबाबतचा ठराव आपण सिनेटच्या बैठकीत मांडला होता. त्यास मंजुरीही मिळाली. विद्यापिठाने सादर केलेल्या प्रस्तावानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी अंबड रोडवर जालना सूतगिरणीनजीक ५६ एकर सरकारी जागा त्यासाठी देण्याची तयारी दर्शविली. शासनाने याविषयी निधीसंदर्भात काढलेल्या त्रुटी विद्यापीठाकडून दूर होतील. प्रा.डॉ. शिवाजीराव मदन,सदस्य विद्यापीठ सिनेट. या उपकेंद्रामुळे जिल्ह्यात ज्या महाविद्यालयांमध्ये पदव्यूत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण नाही, तेथील विद्यार्थ्यांना पदव्यूत्तर शिक्षणासाठी फायदा होईल. विद्यापिठात शिक्षणासाठी जिल्ह्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा भारही त्यामुळे कमी होईल. या उपकेंद्राच्या माध्यमातून अन्य सुविधा केंद्रेही सुरू होतील. विद्यापिठाने आपला भार कमी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात उपकेंद्र स्थापन करावे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा फायदा होईल.प्राचार्य डॉ. रमेश अग्रवाल, जेईएस महाविद्यालयडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र जालना येथे स्थापन करण्यास शासनाची उदासिनता प्रकर्षाने दिसून येते. हा प्रस्ताव मागील सरकारच्या काळात प्रलंबित होता व आता विद्यमान सरकारच्या काळातही प्रलंबित आहे. उपकेंद्राच्या जालना येथील स्थापनेबाबत आपण शासनस्तरावर पाठपुरावा करणार आहोत. विद्यापीठ उपकेंद्र जालन्यात स्थापन होणे गरजेचे आहे. -आ. अर्जुन खोतकर, जालना
विद्यापीठ उपकेंद्राचा प्रस्ताव रखडला
By admin | Updated: May 25, 2015 00:24 IST