औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा प्राप्त करण्यासाठी ग्रंथालयाचा मोलाचा वाटा आहे. विद्यापीठातील हे ग्रंथालय राज्यात पहिले आहे. विद्यापीठातील ग्रंथालयाच्या वतीने मंगळवारी गं्रथपाल दिनानिमित्त व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या हस्ते या व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी कुलगुरू म्हणाले की, ग्रंथालय हा प्रत्येक शैक्षणिक संस्थेचा आत्मा असून तीच खरी संस्थेची संपत्ती आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ज्ञानमहर्षींच्या नावाने असलेल्या या विद्यापीठातील ‘नॉलेज रिसोर्स सेंटर’ आज राज्यात नंबर वन आहे. या ग्रंथालयाचे नाव केवळ राज्यातच नव्हे, तर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्न करू. ग्रंथालयामध्ये सध्या माहिती तंत्रज्ञानाचा वापर प्रचंड वाढला आहे. त्यामुळे आता ग्रंथपालाने माहिती तंत्रज्ञानाची कास धरण्याची गरज आहे.या प्रसंगी कुलसचिव डॉ. धनराज माने, ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. कारभारी काळे, पुणे येथील डॉ. एन. बी. दहीभाते, विशाल शर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. धर्मराज वीर यांनी केले. सूत्रसंचालन सहायक ग्रंथपाल सतीश पद्मे यांनी केले. सहायक ग्रंथपाल शाहिस्ता परवीन यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी ग्रंथालयशास्त्र पीएच. डी. प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यापीठातील ग्रंथालय राज्यात ‘नंबर वन’
By admin | Updated: August 13, 2014 01:40 IST