वाळूज महानगर : आखाती देशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या तिघांना वाळूज एमआयडीसी पोलिसांनी मुंबईतून आज अटक केली. विशेष म्हणजे या भामट्यांचा कोणताही ठावठिकाणा नसताना पोलिसांनी ही कामगिरी फत्ते केली.आकाश शर्मा या भामट्याने वाळूज औद्योगिक क्षेत्रातील ४२ बेरोजगार युवकांना फसवून पळ काढला होता. त्याच्या थापेला वाळूज औद्योगिक क्षेत्रात काम करणारे महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल इ.भागांतून आलेले युवक बळी पडले होते. पैसे जमा झाल्यानंतर आकाशने या बेरोजगारांना कॉल लेटर देऊन त्यांना ३० तारखेला कुवैतचे विमान असल्याचे सांगून मुंबईला बोलावून घेतले होते. हे तरुण २९ ला मुंबईत गेले. तेव्हा पासपोर्टवर स्टॅम्प व स्वाक्षरी बाकी असल्याची थाप मारून आकाश लॉजमधून फरार झाला. ३० नोव्हेंबरला कुवैतला जाणारे विमान असल्यामुळे हे युवक मुंबई विमानतळावर गेले होते. मात्र, विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनी व्हिसा व पासपोर्ट नसल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारला. त्यामुळे युवक बिचारे हिरमुसले होऊन वाळूज औद्योगिक क्षेत्रात परतले. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात २ डिसेंबर रोजी पवन सिंह परमात्मा सिंह यांच्या तक्रारीवरून आकाश शर्मा याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मागील आठवडाभरापासून फरार असलेल्या आकाश शर्मा व त्याच्या साथीदारांचा पोलीस शोध घेत होते; परंतु पोलिसांना तो चकवा देत होता. आकाशचा शोध घेण्यासाठी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक मुंबईला रवाना झाले होते. या पथकाने कोणतीही माहिती नसताना, पत्ता नसताना व भामट्यांचे मोबाईल बंद असताना आकाश केदारनाथ शर्मा (मूळ नाव ब्रिदचंद्र शर्मा) याच्यासह त्याचा मुलगा शुभम आकाश शर्मा व महंमद अफरोज अशा तिघांना नाला सोपारा पालघर, जि. ठाणे येथून अटक केली.
बेरोजगारांना गंडा; तिघांना अटक
By admin | Updated: December 8, 2014 00:23 IST