लातूर : विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यावरही लातूर शहरात राजकीय पक्षांचे झेंडे, चिन्हं वाहनांवर लावून राजकीय पुढारी बिनधास्त फिरत होते़ याबाबत ‘लोकमत’ने छायाचित्रांसह वृत्त प्रकाशित करताच निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश काढले़ त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने मंगळवारी दहा वाहनांवर कारवाई केली आहे़ प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत वाहनांवर कार्यवाहीसाठी आदर्श आचारसंहिता व मोटार वाहन कायद्याच्या तरतुदींप्रमाणे वाहन तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे़ प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ़ डी़ टी़ पवार यांनी फ्लार्इंग स्कॉडच्या पथकाला सूचना देऊन कारवाई मोहिम हाती घेतली आहे़ त्यानुसार मोटार वाहन निरीक्षक बडगिरे यांच्या पथकाने लातूर शहरात विविध ठिकाणी वाहनांची तपासणी करून विनापरवाना राजकीय पक्षांचे चिन्ह, झेंडे व बॅनर लावणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे़ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय लावण्यात आलेले राजकीय पक्षाचे ध्वज, चिन्ह लावणाऱ्या १० वाहनधारकांकडून १ हजार ६०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे़ निवडणूक आचारसंहितेची अंमलबजावणी करणारी बहुतांश कार्यालये लातूर शहरात असतानाही विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या वाहनांवर उघडपणे पक्षाचे चिन्ह, ध्वज लावल्याचे लोकमत चमूने केलेल्या पाहणीत आढळून आले़ यासंदर्भात वृत्त प्रकाशित करताच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कारवाईच्या सूचना केल्या़ त्यानुसार प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने कारवाई मोहिम हाती घेतली आहे़ वाहनधारकांनी आपल्या वाहनांवरील राजकीय नेत्यांचे छायाचित्र, पोस्टर्स, राजकीय पक्षांचे चिन्ह, झेंडे, संघटनेचे नाव विनापरवानगी जाहिरात अथवा इतर मजकूर असेल तर तातडीने काढून टाकून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आऱटी़गिते यांनी केले आहे़
विनापरवाना राजकीय ‘चिन्ह’; १० वाहनांवर कारवाई
By admin | Updated: September 24, 2014 00:46 IST