वाळूज महानगर : चोरीची दुचाकी विक्रीसाठी ग्राहक शोधणारा दुचाकी चोरटा एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. आरोपी दुचाकी चोर विकास विष्णू पट्टेकर (१९ रा.घाणेगाव) याच्या ताब्यातून ४ तर ग्राहकांना विक्री केलेल्या ४ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहे. चोरीच्या दुचाकी खरेदी करणाऱ्या चौघांना सहआरोपी करण्यात आले आहे.
साजापूर येथील इम्रानखान पठाण याची ८ जुलै रोजी वाळूज एमआयडीसी परिसरातून दुचाकी चोरीला गेली होती. दरम्यान, शनिवारी एक इसम वाळूज एमआयडीसीतील एनआरबी चौकात चोरीची दुचाकी विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांना मिळाली. या माहितीनंतर सहायक पोलीस निरीक्षक गौतम वावळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून संशयित दुचाकी चोरास ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता, त्याने आपले नाव विकास विष्णू पट्टेकर (१९ रा.घाणेगाव) असल्याचे सांगितले. आरोपी विकास याच्याकडे मिळून आलेल्या दुचाकीची चौकशी केली असता, त्याने १५ दिवसांपूर्वी वाळूज एमआयडीसीतील सी सेक्टरमधून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलीस कोठडीत आरोपी विकास पट्टेकर याने वाळूज एमआयडीसी परिसरातून एकूण ८ दुचाकी चोरल्याची कबुली देत, यातील ५ दुचाकी वाळूज व पंढरपुरात परिसरात विक्री केल्याचे पोलिसांना सांगितले.
विकास पट्टेकर हा ग्राहकांचा शोध घेऊन कागदपत्रे नंतर आणून देतो, असे म्हणून मिळालेल्या त्या किमतीत दुचाकीची विक्री करीत होता. दुचाकी विक्री केलेल्या ग्राहकाची नावे पोलिसांना सांगितले. यानंतर, पोलीस पथकाने अजय दाभाडे, शेख साजिद (दोघेही रा.पंढरपूर) व रिजवान पठाण व शेख अबरार (दोघेही रा.वाळूज) यांच्या ताब्यातून ४ तर विकास पट्टेकरच्या ताब्यातून ४ अशा ८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, सहा.निरीक्षक गौतम वावळे, उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव, पोना.संजय हंबीर, प्रकाश गायकवाड, नवाब शेख, पोहेकॉ. शेख कय्युम, पोकॉ.विनोद परदेशी आदींनी यशस्वीपणे पार पाडली.
चोरीच्या दुचाकी खरेदी करणारे सहआरोपी
दुचाकी चोर विकास पट्टेकर याच्याकडून चोरीच्या दुचाकी खरेदी करणाऱ्या अजय दाभाडे, शेख साजिद (दोघेही रा.पंढरपूर), रिजवान पठाण व शेख अबरार (दोघेही रा.वाळूज) या चौघांना सहआरोपी करण्यात आले आहे.
फोटो ओळ
वाळूज एमआयडीसी पोलिसांनी दुचाकी चोरटा विकास पट्टेकर याच्याकडून ८ दुचाकी जप्त करण्यात आल्या.