तामलवाडी : राष्ट्रीय महामार्गावर उभा असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना दोन मालवाहू ट्रकची समोरासमोर जोराची धडक झाली़ या अपघातात एका ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला़ ही घटना तुळजापूर -सोलापूर महामार्गावरील माळुंब्रा शिवारात सोमवारी पहाटे साडेपाच वाजता घडली. सोलापूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील माळुंब्रा शिवारात सोमवारी पहाटे एक विनानंबरचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह उभा होता. या ट्रॅक्टरला ओव्हरटेकर करून तुळजापूरकडे जाणाऱ्या मालट्रकची (क्रं. एम.एच. २६ एच. ८३९५) सोलापूरकडे केळी वाहतूक करणारा ट्रकशी (क्ऱएम.एच. १२ एफ.झेड. ८९१२) समोरासमोर जोराची धडक झाली. हा अपघात घडताच ट्रकचा (क्र. एम.एच. २६ एच. ८३९५) चालक पसार झाला. तर केळी वाहतूक करणाऱ्या ट्रकचा चालक आतच अडकला. जखमी चालकाचे पाय अडकले. पोटात स्टेअरींग रुतली होती. प्रवाशी, चालक माळुंब्रा, सांगवी (मार्डी) येथील तरुणांनी अपघातस्थळी धाव घेवून ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले. या अपघातामुळे तुळजापूर रस्त्यावरील वाहतूक दोन तास खोळंबली होती. तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि मिर्झा बेग, साहेबराव शिंदे, राजेंद्रसिंह ठाकूर, बनसोडे यांनी घटनास्थळी धाव घेवून अपघातग्रस्त वाहने बाजूला सारुन वाहतूक सकाळी साडेआठ वाजता सुरु केली़ जखमी चालकास तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद तामलवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे.दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाची कामे चालू असल्याने सध्या तुळजापूर-सोलापूर रस्त्यावर एकेरी मार्गाने दुहेरी वाहतूक सुरु आहे. अशावेळी रात्री नादुरुस्त झालेली वाहने भर रस्त्यावर उभी ठेवण्यात येतात़ त्यामुळे अपघात वाढले आहेत़ अपघातस्थळी उभा असलेल्या ट्रॅक्टर व ट्रॉलीला नंबर नाही अथवा दिव्याची सोय नाही. पार्किंगचा दिवा, इंडिकेटर नव्हता़ अशा पध्दतीने वाहने उभा करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़ (वार्ताहर)
दोन ट्रकची समोरासमोर धडक
By admin | Updated: July 12, 2016 00:52 IST