वाशी : शासकीय कामकाजात टाळटाळ केल्याचा ठपका ठेवून दोन तलाठ्यांविरूद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ६ मे रोजी केलेल्या या कारवाईमुळे कामचुकार कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहेत. वाशी तालुक्यातील पारा, फक्राबाद व डोंगरेवाडी सज्जाचे तलाठी पी. एस. पारवे हे शेतकर्यांना नेहमी अरेरावी व उद्धटपणाची भाषा वापरतात, अशा स्वरूपाच्या तक्रारी महसूल प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्याचप्रमाणे न्यायालयाचे आदेशाचे पालन केले नसल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तसेच पारवे यांची नायब तहसीलदार अतुल वाघमारे, शिवानंद बिडवे व अव्वल कारकून दशरथ शिंंदे यांनी दप्तर तपासणी केली होती. या तपासणीतही अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. या सर्व बाबींवरून भूमचे उपविभागीय अधिकारी संतोष राऊत यांनी पारवे यांच्याविरूद्ध निलंबनाची कारवाई केली. त्याचप्रमाणे कडकनाथवाडी येथील तलाठी पी.टी.भातलवंडे हे राष्टÑीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाअतंर्गतच्या कामकाजातील अनियमितता, कार्यालयीन बैठकीस अनधिकृतपणे गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवत तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी ६ मे रोजी निलंबनाची कारवाई केली. यापुढेही जे कर्मचारी कामामध्ये कुचराई करतील त्यांच्याविरूद्ध कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
दोन तलाठी निलंबित
By admin | Updated: May 8, 2014 00:11 IST