कळंब : न्यायालयाच्या आवारातून कायदेशीर रखवालीत असलेला दुचाकी चोरटा २ आॅगस्ट रोजी फरार झाला होता. याप्रकरणी कर्तव्यावर असलेल्या कळंब पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.एका दुचाकी चोरीप्रकरणात लोणखस पारधी वस्ती (ता. वाशी) येथील शिवाजी उर्फ चिवल्या बप्पा काळे यास पोलिसांनी गजाआड केले होते. सदर आरोपीस पोलीस कोठडीची मुदत संपल्याने २ आॅगस्ट रोजी न्यायालयासमोर हजर केले होते. यावेळी न्यायालयाचे कामकाज संपल्यानंतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना गुंगारा देवून शिवाजी काळे फरार झाला होता. यावेळी पोलीस ठाण्याचे सुहास सोनके व अशोक माळी हे कर्तव्यावर होते. सदर आरोपी सोमवारी वाशीलगत पुनश्च गजाआड केला असला तरी तत्कालीन कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार होती. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनेच्या वेळी कार्यरत असलेल्या सुहास सोनके व अशोक माळी या कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून, तसे आदेश निर्गमित केले आहेत. सदर आदेश जारी करण्यात आले असून, संबंधितांना प्राप्त झालेले नाहीत. या कर्मचाऱ्यांच्या निलंबन कारवाईस पोलीस सूत्रांनी दुजोरा दिला आहे.