जालना : मजुरांकडून मागणी असताना देखील मग्रारोहयोची कामे सुरू न केल्याप्रकरणी मंठा तालुक्यातील दोन ग्रामसेवकांवर तडकाफडकी निलंबन कारवाई करण्यात आली आहे. जि.प. पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.टी. केंद्रे यांनी बुधवारी सायंकाळी या निलंबनाचे आदेश काढले.निलंबनाची कारवाई झालेल्या ग्रामसेवकांमध्ये पांगरी गोसावी येथील जे.बी. नागरे व खोराडसावंगी येथील कोरडे यांचा समावेश आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे यांनी बुधवारी परतूर व मंठा तालुक्यातील मग्रारोहयो कामांच्या मागणीसंदर्भात आढावा घेतला. परंतु या दोन्ही तालुक्यात अनुक्रमे ४० व ३५ ग्रामपंचायतींनी कामाची मागणी नसल्याचे लेखी पत्र पंचायत विभागाकडे दिले आहे.यासंदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे म्हणाले की, जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतींकडे मग्रारोहयोची कामे मोठ्या प्रमाणावर सेल्फवर आहेत. मागणीनुसार कामे तात्काळ सुरू करावीत, असे शासनाचे निर्देश आहेत. परंतु कामांची मागणी कमी असल्याचे सांगण्यात येते. तर दुसरीकडे मजुरांना कामे नसल्याच्या तक्रारी होतात. याबाबतची खात्री करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींअंतर्गत तपासणी करण्यात येत आहे. कामांची मागणी असून देखील कामे सुरू करण्यात आली नसतील, तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. (प्रतिनिधी)
दोन ग्रामसेवक तडकाफडकी निलंबित
By admin | Updated: April 16, 2015 00:57 IST