औरंगाबाद : पैसे लावून गोट्या खेळण्यामध्ये सुमारे तीन ते चार हजार रुपये उधारी झाली. या उधारीसाठी तरुण सारखा तगादा लावत आहेत. ते घरी येण्यापूर्वीच त्यांची उधारी फेडण्यासाठी चक्क त्यांनी शुक्रवारी दुपारी मित्रनगर येथील रहिवासी निवृत्त शिक्षिकेच्या घरात घुसून मंगळसूत्र हिसकावण्याचे धाडस केले. पंकज संत्रे (१८, रा. भानुदासनगर, जवाहर कॉलनी) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, मित्रनगर येथील एका अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या विद्या पाटील या निवृत्त शिक्षिकेच्या घरात घुसून पंकज आणि त्याच्या १६ वर्षीय मित्राने चाकूचा धाक दाखवून मंगळसूत्र हिसकावून नेले होते. या घटनेनंतर आरोपी तेथून निघून गेले. घटनास्थळापासून काही अंतरावरील एका घरावर आणि हॉटेलवरील सीसीटीव्हीमध्ये हे दोन्ही तरुण कैद झाले होते. पोलिसांनी संशयितांना सीसीटीव्ही फुटेज दाखविले. सीसीटीव्हीतील तरुण भानुदासनगर येथे राहणारा पंकज संत्रे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पंकज आणि दुसऱ्या तरुणाला त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी या घटनेशी आपला काहीच संबंध नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. उधारी फेडण्यासाठी आपण मित्राच्या मदतीने ही लूट केल्याचे सांगितले. त्यानंतर लुटलेले पावणेदोन तोळ्याचे मिनी गंठण काढून दिले.निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक प्रशांत आवारे, अमित बागूल, कर्मचारी नितीन मोरे, विश्वास शिंदे, विलास वाघ, सुधाकर राठोड, सुनील पाटील, लालखाँ पठाण, धर्मराज गायकवाड, राम तांदळे यांनी ही कामगिरी केली.
शिक्षिकेला लुटणारे दोन मित्र गजाआड
By admin | Updated: October 16, 2016 01:11 IST