वलांडी : निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ तर कधी गारपीट असे संकट शेतकऱ्यांवर कोसळत आहे़ सध्या पावसाने ताण दिल्याने या भागातील शेतकऱ्यांवर तिहेरी पेरणीचे संकट ओढवले आहे़यंदाच्या फेब्रुवारी अखेरीस व मार्चच्या पहिल्या आठवड्यात गारपीट झाली़ त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ या संकटातून सावरत असताना पुन्हा पावसाने उघाड दिल्याने संकट आले आहे़ मृग नक्षत्रात वेळेवर पाऊस न झाल्याने वलांडी परिसरातील पेरण्या उशिरा झाल्या़ परंतु, बियाणाची उगवण झाली नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची मूठ नाईलाजास्तव धरली़ मात्र त्यांचीही उगवण झाली नसल्याने शेतकरी हताश झाला आहे़ आता तिबार पेरणी करायची का? केली तर मूग, उडीद या पिकाचा तर हंगाम निघून गेला़ आता सोयाबीन पेरायचे का? पेरायचे तर मग बी-बियाणे कसे घ्यायचे असे नानाविध प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहेत़ गारपिटीच्या खाईत सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता तिहेरी पेरणीचे संकट आले आहे़ अशा परिस्थितीत पूर्वीच कर्ज काढून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना आता दुबार पेरणीसाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी वलांडीसह परिसरातील हेळंब, धनेगाव, हिसामनगर, जवळगा, कवठाळा, टाकळी, बोंबळी, दवणहिप्परगा या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे़ (वार्ताहर)देवणी तालुक्यातील वलांडी परिसरातील शेतकऱ्यांनी सुरुवातीस अल्प पावसावर पेरणी केली. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. त्यामुळे दुबार पेरणी केली. पुन्हा निसर्गाने दगा दिला. आता तिसऱ्यांदा पेरणी करावी लागत आहे.
शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट
By admin | Updated: July 22, 2014 00:16 IST