जालना : युवक व युवतींमध्ये वाचन संस्कृती अधिक गतीमान व्हावी, या उद्देशाने संपूर्ण मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कार्यशाळा घेण्याचा मानस मराठवाडा साहित्य परिषदेच्या सदस्या डॉ. संजीवनी तडेगावकर यांनी व्यक्त केला. रंगभूमी नियामक मंडळावर तडेगावकर यांची अलिकडेच निवड झाली. यानिमित्त लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत डॉ. तडेगावकर म्हणाल्या, बहुजन समाजातील महिलांना पूर्वी शिक्षणाची दारे बंद असायची. मात्र, कालांतराने झालेल्या विविध बदलांमुळे आता महिलांचे साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे. कुटुंबात शैक्षणिक वातावरण असल्याने शिक्षणासाठी तशी परवड झाली नाही. गावात लहानपणी कीर्तन ऐकायची. त्यातूनच शब्द संग्रह वाढत गेला आणि या शब्दांतूनच अनेक कविता माझ्याकडून रचल्या गेल्या. वाचन, मनन आणि चिंतनामुळे माझ्यातील कवयित्रीचा जन्म झाला. साहित्य क्षेत्रात काम करत असताना उर्मीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील साहित्य वर्तुळात माझा वावर वाढला. उर्मीच्या अनेक कवी संमेलनामध्ये मी कविता सादर केलेल्या आहेत. यामुळे आणखी चांगल्या कविता रचण्यासाठी प्रोत्साहन मिळते. गत वर्षी मराठवाडा साहित्य परिषदेची निवडणूक झाली. साहित्यिकांच्या आग्रहामुळे या निवडणुकीत उतरले आणि निवडूनही आले. साहित्य परिषदेच्या माध्यमातून आता आगामी काळात संपूर्ण मराठवाड्यात अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवायचे आहेत. ज्यामुळे साहित्य परिषद खऱ्या अर्थाने ग्रामीण भागत रुजण्यास मदत होईल. मुख्यत्वे करुन ग्रामीण भागातील युवक व युवतींमध्ये वाचन संस्कृती रुजविण्याचा आणि त्यारुपाने एक चळवळ उभारण्याचा माझा प्रयत्न असेल. त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विविध स्पर्धा घेण्यात येतील. जेणेकरुन मुलांच्या सृजनशीलतेला वाव मिळून त्यातून अनेक लेखक, कवी निर्माण होतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. आगामी दोन वर्षांच्या काळात मराठवाडा साहित्य परिषदेला संचालक मंडळाच्या सहकार्याने वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न राहील, असेही त्या म्हणाल्या.लहानपासूनच आईने दिलेल्या पाठबळामुळे आजपर्यंत यश मिळवू शकले. आईला शिक्षणाची ओढ होती. त्यामुळे मी खूप शिकावं अशी तिची इच्छा होती. तिच्या या भूमिकेमुळे मला नेहमी प्रोत्साहन मिळत गेले. तुकाराम, जनाबाई, कान्होपात्रा या व्यक्तींविषयी मला विशेष आकर्षण होते. पीडित, शोषितांचे लिखाण मनाला अधिक भावते. ८० च्या दशकानंतर कवियत्रींच्या स्त्रीवादी जाणीवा अधिक प्रगल्भ झाल्या. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात वर्षातून किमान एक जिल्हास्तरीय संमेलन व्हावे, यासाठी प्रयत्न असून, त्यादृष्टिने मराठवाडा साहित्य व सांस्कृतिक मंडळाची वाटचाल सुरू आहे.
मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न..!
By admin | Updated: November 30, 2015 23:29 IST