औरंगाबाद : एकोड-पाचोड ते बीड बायपासरोडपर्यंत पाठलाग करून वाळूमाफियाचा हायवा ट्रक महसूलच्या पथकाने शुक्रवारी सकाळी पकडला. पाठलाग करणाऱ्या महसूल पथकाच्या कारला साईड न देता ट्रकने ‘डॅश’मारला. त्यात पथकाच्या कारची ड्रायव्हर साईडची बाजू चेपली. धडक जोरात बसली असती तर पथकाची कार रोडच्या बाजूला जाऊन पलटली असती. वाहनचालक अविनाश जाधव यांनी कारवर ताबा मिळविला. परिणामी कारला बाहेरून फक्त ‘डॅश’लागला आणि मोठी दुर्घटना टळली. ट्रक बायपास रोडवरील गांधेली परिसरातील एका गल्लीत गाळात रुतल्यामुळे ट्रकचालकाने ट्रक सोडून पळ काढला. याप्रकरणी नायब तहसीलदार प्रशांत काळे यांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यात ट्रक (क्र.एमएच-२० डीई-२१२२) च्या चालक, मालकाविरोधात तक्रार दिली आहे. पथकप्रमुख नायब तहसीलदार काळे यांनी सांगितले, वाळूचा उपसा करून हायवा ट्रक एकोड-पाचोड येथून निघाला होता. पथक कार (क्र. एमएच-२० डीजे-८९) ने त्या ट्रकचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. परंतु ट्रकचालकाने पथकाला २० ते ३० कि़मी.पर्यंत हुलकावणी दिली. अखेर गांधेली शिवारात ट्रक गाळात रुतल्यामुळे पथकाने तो ताब्यात घेतला. दरम्यान, चालकाने तेथून पळ काढला. चिकलठाणा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार देण्यात आली असून, के्रनच्या साह्याने ट्रक बाहेर काढून ठाण्यात जमा केला आहे. आधीच वाळूपट्ट्यांकडे ठेकेदारांनी पाठ फिरवलेली आहे.
वाळूमाफियाचा पथकावर ट्रक घालण्याचा प्रयत्न
By admin | Updated: June 25, 2016 00:44 IST