कोलंबो : समुद्री सुरक्षेबाबत त्रिपक्षीय चर्चेत भारताकडून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल सहभागी झाले होते. श्रीलंका व मालदीव यांच्याबरोबर अशाप्रकारची ही चौथी बैठक सहा वर्षांनी होत आहे. यापूर्वी २०१४ मध्ये ही बैठक नवी दिल्लीत झाली होती.
कोलंबोमध्ये भारतीय उच्चायोगाने सांगितले की, डोभाल, श्रीलंकेचे संरक्षण सचिव (सेवानिवृत्त) कमल गुणारत्ने व मालदीवचे संरक्षणमंत्री मारिया दीदी यांनी त्रिपक्षीय बैठकीतील व्यापक चर्चेनंतर हस्ताक्षर करून त्याला औपचारिक रूप दिले.
श्रीलंकेच्या विदेश मंत्रालयाने बैठकीची सविस्तर माहिती न देता ट्विट करून म्हटले आहे की, श्रीलंकेचे विदेशमंत्री दिनेश गुणावर्धने यांनी मुख्य अतिथी म्हणून या बैठकीला संबोधित केले. विदेश सचिव ॲडमिरल प्रो. जयनाथ कोलंबेज यांनीही या बैठकीत सहभाग नोदविला.
या बैठकीत प्रशांत क्षेत्र व हिंद महासागरामध्ये आपला प्रभाव वाढविण्याच्या चीनच्या प्रयत्नांबाबत चर्चा झाली. श्रीलंकेच्या सेनेने गुरूवारी म्हटले होते की, या बैठकीस बांगलादेश, मॉरिशस व सेशल्सचे निरीक्षकही हजर राहतील.
शुक्रवारी येथे दाखल झाल्यानंतर डोभाल यांनी कालच मालदीवच्या संरक्षणमंत्री मारिया दीदी यांची भेट घेऊन चर्चा केली होती. हिंद महासागरात प्रमुख द्वीपीय देशांबरोबर द्विपक्षीय सामंजस्य आणखी मजबूत करण्यासाठी सौहार्दपूर्ण व विस्तृत चर्चा केली.
डोभाल यांनी श्रीलंकेचे संरक्षण सचिव गुणारत्ने यांचीही भेट घेऊन चर्चा केली. दोन्ही देशांतील मौल्यवान सहकार्य आणखी वाढविण्यासाठी उपाययोजना करण्यावर सहमती झाली. कोलंबोच्या भारतीय उच्चायोगाने अन्य एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, डोभाल यांनी गुणारत्ने यांच्याशी चर्चा केली. संरक्षण व सुरक्षा सामंजस्यावर यावेळी विचारविनिमय झाला.
हिंद महासागर क्षेत्रात समुद्री सुरक्षेवर समन्वित कारवाई, मदत व बचाव मोहिमेचे प्रशिक्षण, समुद्रातील वाढते प्रदूषण संपविण्यासाठी पावले उचलणे, माहितीचे आदानप्रदान करणे, अवैध शस्त्रास्त्रे, अमली पदार्थांच्या तस्करीवर लगाम लावणे यासारख्या विषयांवर चर्चा झाली.
दरम्यान, नवी दिल्लीतील विदेश मंत्रालयाने याबाबत म्हटले आहे की, एनएसए स्तरावरील त्रिपक्षीय बैठक हे हिंद महासागराच्या देशांतील सहकार्य वाढविण्याचे प्रभावी व्यासपीठ आहे.
डोभाल यांचा यावर्षी हा दुसरा श्रीलंका दौरा आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये ते श्रीलंकेत आले होते व दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली होती.