लातूर : लातूर शहरातील खाजगी रुग्णालयाची नोंदणी व नूतनीकरणाचे सर्व रेकॉर्ड जिल्हा शल्य चिकित्सकांकडून मनपाच्या आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. बॉम्बे नर्सिंग होम अॅक्टनुसार आता खाजगी रुग्णालयांचे रेकॉर्ड मनपाकडे हस्तांतरित झाले आहे. लातूर शहरात मनपाच्या हद्दीत ४५० नोंदणीकृत खाजगी रुग्णालये आहेत. या रुग्णालयांतील कामकाज कसे असावे, त्यात डॉक्टर्स व रुग्णसेवा कशी दिली जाते, त्याच्या सर्व कागदपत्रांची देखरेख जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत होत होती. परंतु, आता बॉम्बे नर्सिंग होम अॅक्टनुसार मनपाच्या आरोग्य विभागाकडे देखरेख आली आहे. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सकांनी नोंदणी क्रमांक १ ते ४१८ पर्यंतच्या खाजगी रुग्णालयांचे सर्व दस्तावेज मनपाच्या आरोग्य विभागाकडे २४ जुलै रोजी सुपूर्द केले आहेत. मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.जी. मजगे, शहर कार्यक्रम व्यवस्थापक आर.एच. खरोळकर, डाटा एन्ट्री आॅपरेटर डी.पी. व्यवहारे, पी.पी. भोसले, सुरेंद्र कांबळे या कर्मचाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.जी. पाठक, विधि समुपदेशक अॅड.ए.पी. मेखले, पीसीपीएनडीटी कक्षाचे आॅपरेटर एन.जी. भंडारे यांच्याकडून रेकॉर्ड ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे आता खाजगी रुग्णालयांचे सर्व दस्तावेज मनपाच्या ताब्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
खाजगी रुग्णालयांचे रेकॉर्ड मनपाकडे हस्तांतरित
By admin | Updated: August 17, 2015 01:05 IST