रमेश शिंदे ,औसाऔसा हे तालुक्याचे, मोठी बाजारपेठ, ऐतिहासिक ठिकाण व शैक्षणिक केंद्र असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गर्दी असते़ बसस्थानक ते अॅप्रोच रोड चौकादरम्यानच्या रस्त्यावर अवैध वाहतूक करणारी वाहने तसेच अॅटोचालकांची मनमानी सुरु असल्याने वाहतुकीचा खेळखंडोबा होत आहे़ त्यामुळे पादचाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे़ औसा शहरात किल्ला मैदान ते हनुमान मंदिर तसेच बसस्थानक ते अॅप्रोच रोड चौक हे दोन मुख्य रस्ते आहेत़ किल्ला मैदान ते हनुमान चौक या रस्त्याचे तीन टप्प्यात रूंदीकरण होणार आहे़ गांधी चौक ते जामा मशीद हा पहिला टप्पा तर गांधी चौक ते मोर गल्ली कॉर्नर या दोन टप्प्याचे काम पूर्ण झाल्यामुळे हा रस्ता रुंद झाला आहे़ जामा मशीद ते हनुमान मंदिर या तिसऱ्या टप्प्याचे काम रखडले आहे़ या रस्त्यावर अनेक दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे़ दुकानासमोर वाहने उभी राहतात़ मोठे वाहन आले की, वाहतुकीची कोंडी होत़ आता या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे़ वाहनधारकांसमोर पादचाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे़ सकाळी शाळा भरताना आणि दुपारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना या वाहतुकीच्या कोंडींचा सामना करावा लागत आहे़बसस्थानक ते अॅप्रोच रोड कॉर्नर हा शहरातील दुसरा मुख्य रस्ता आहे़ या रस्त्यावर अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालय आहे़ विविध बँकांच्या शाखा आहेत़ त्यामुळे रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते़ या रस्त्याचे अंतर दीड ते दोन कि़मी़ आहे़ या रस्त्यावर जवळपास ८० ते १०० आॅटोचालक आपली वाहने चालवितात़ लातूरहून निलंगा, उमरगा, सोलापूरकडे जाणाऱ्या काही बसेस बसस्थानकात येत नाहीत़ त्यामुळे गावात येण्यासाठी प्रवाशांना आॅटोचा आधार घ्यावा लागतो़ अॅप्रोच रोड चौकात बस थांबली की, किमान पाच ते दहा आॅटो बसच्या दरवाज्याजवळ येऊन थांबतात़ त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे़ तसेच बसस्थानकाच्या प्रवेश द्वाराजवळ बिंदासपणे वाहने उभी करण्यात येतात़ शहरातील निम्यापेक्षा जास्त आॅटो विनापरवाना आहेत़ विशेष म्हणजे काही आॅटोचालक हे अल्पवयीन आहेत़ रस्त्यात एखाद्या प्रवाशाने हात केला की, मागील वाहनाचा विचार न करता हे आॅटोचालक चक्क रस्त्यातच आॅटो उभा करतात़ त्यामुळे छोटे-मोठे अपघातही घडत आहेत़ त्याचबरोबर ग्रामीण रूग्णालयासमोरही अवैैध वाहतूक करणारी वाहने उभी असतात़ त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे़ परिणामी पादचाऱ्यांना चालणेही अवघड होत आहे़ संबंधितांनी याकडे लक्ष देऊन वाहतुकीची समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे़
वाहतुकीचा खेळखंडोबा !
By admin | Updated: September 1, 2014 01:08 IST