लातूर : शहर वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेने वाहन तपासणीची मोहीम राबविली. गेल्या महिनाभरात वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या २ हजार ७९ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ३ लाख २७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.शहरातील वाहनधारकांना शिस्त लागावी़ शहरातील अवैध पार्किंगला आळा बसावा, या दृष्टिकोनातून वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दोन पथकाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाईची मोहीम सुरु केली आहे़ यामध्ये अवैध काळी-पिवळी वाहतूक करणाऱ्या जीप, ट्रॅव्हल्स, मिनीडोअर, दुचाकी या वाहनधारकांकडे लायसन नसणे, वाहनाचे कागदपत्रे सोबत न बाळगणे, ट्रीपल सिट प्रवास करणे़ वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने वाहन पार्कींग करणे, नो पार्किंग झोनचे उल्लंघन करणे, आॅटो चालकाने ड्रेसकोड न वापरणे आदी कारणास्तव वाहनधारकावर कारवाई करण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे़ या मोहिमेच्या माध्यमातून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ९२ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून या माध्यमातून महिनाभरात ९२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला़ तसेच आॅटो, चारचाकी, दुचाकी अशा वाहनावरही वाहतूक शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे़ यामध्ये महिनाभरात २०७९ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, २७ दिवसामध्ये ३ लाख २७०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
वाहतूक शाखेने ठोठावला तीन लाखांचा दंड
By admin | Updated: October 30, 2014 00:27 IST