शिवहरी डोईफोडे , टेंभूर्णीग्रामीण भागात बळीराजाला बळ देण्याचे काम करणाऱ्या सर्जा-राजाचे विशेष महत्त्व असते. सर्जा-राजाला सजविण्यासाठी लागणारा साज पारंपरिक पद्धतीने बनविण्याचे काम टेंभूर्णी येथील तागवाली कुटुंब करतात. रेडीमेड साज मिळत असल्याने या व्यवसायावर परिणाम झाल्याचे श्यामराव तिकटे यांनी सांगितले.तागवाली समाजाचा हा पिढीजात व्यवसाय आहे. पूर्वी आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शेतकऱ्यांना तागापासून बनविलेल्या वस्तूच घ्याव्या लागत होत्या. मात्र, परिस्थितीनुसार आता सुतापासून वस्तू बनविण्याची कला पिढीजात टिकवून ठेवली असल्याचे तिकटे सांगतात. रेडिमेड साज स्वस्तात उपलब्ध मात्र, टिकावू नाही. रंगीबेरंगी व आकर्षक असल्याने ग्राहकांचा ओढा त्याकडे जास्त आहे. जुने ग्राहक आमच्याकडून खरेदी करतात. पूर्वी तागाचे पीक शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेत होते. तागापासून गोणा, जोते, सोल, आसूड व इतर दोरखंड बनविल्या जातात. गेल्या पाच सहा वर्षापासून तागांच्या वस्तूसह सुतापासून वेसन, म्होरकी, कांडके, गेठा, सर, कोड्यांचे गेठे, रंगीबेरंगी गोंडे बनविण्याचे कामही सुरू आहे. संपूर्ण कुटुंब पोळ्याअगोदर दोन तीन महिन्यांपासून या वस्तू बनविण्यास सुरूवात करतात. सुत ८० रुपये किलो मिळते. ते जळगाव येथून आणतो. पारंपरिक व्यवसाय असल्याने व वस्तू बनविण्याची आवड असल्याने हा व्यवसाय जोपासला आहे. पशुधनाची घटती संख्या व मोठ्या शेतकऱ्यांनी बैलाऐवजी यंत्राद्वारे शेती कसणे सुरू केले आहे. लहान शेतकऱ्यांना परवडणार नाही, अशा बैलांच्या किंमती वाढल्या आहेत. पडिक शेती शिल्लक नसल्याने पशुधन सांभाळणे कठीण झाले आहे. त्यातच वारंवार दुष्काळ पडत असल्याने पशुधन चारा, पाण्याअभावी सांभाळणे कठीण आहे. अशा अनेक समस्यांमुळे आमच्या समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला घरघर लागली आहे. शासनाच्या योजना असल्या तरी बँकांच्या उदासिन धोरणामुळे कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळत नसल्याची खंत श्यामराव तिकटे, भास्कर तिकटे, तुळशीदास तिकटे यांनी व्यक्त केली.
बैलांचा साज बनविणाऱ्या पारंपरिक व्यवसायाला लागली घरघर
By admin | Updated: August 25, 2014 01:36 IST