औरंगाबाद : सार्वजनिक नवरात्रोत्सवात पुरुषांची मक्तेदारी असली तरीही शहरात महिलांच्या पुढाकारानेच सार्वजनिक गरबा खेळण्याची परंपरा सुरूझाली. यास ५५ वर्षे पूर्ण होत आहेत. वनिता महिला मंडळ हे शहरातील पहिले सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ ठरले, ज्याने मैदानात गरबा खेळण्यास प्रारंभ केला. उल्लेखनीय म्हणजे, शहरात पहिला सार्वजनिक गणेशोत्सवही महिलांनीच सुरू केला होता. गुजराती हायस्कूलच्या हॉलमध्ये त्यावेळी २५ ते ३० महिला एकत्र येऊन गरबा खेळू लागल्या. पूर्वी महिलाच गरबा खेळत असत. त्यानंतर गुजराती विकास मंडळाने गुजराती समाजातील स्त्री-पुरुषांसाठी शाळेच्या मैदानावर गरब्याचे आयोजन केले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर स्त्री व पुरुष सोबत गरबा खेळण्याची प्रथाच सुरू झाली. रमणभाई पारीख यांनी यासाठी तेव्हा पुढाकार घेतला होता. मीनाबेन पटेल म्हणाल्या की, त्यावेळी रात्री ९.३० वाजता गरब्याला सुरुवात होई व पहाटे ४ वाजेपर्यंत गरबा खेळला जात असे. चंपाबेन सक्सेना (मिठावाला) या त्यावेळी गरब्याचे पारंपरिक गीत गात असत. त्यांना सहगायिका म्हणून मी साथ देत असे. गुजराती हायस्कूलनंतर कसुपारख गल्लीतील गायत्री मंदिर, कुंवारफल्लीतील महालक्ष्मी मंदिर, त्यानंतर जालना रोडवरील भावेश पटेल यांच्या घरासमोरील अंगणातही गरबा खेळला जाऊ लागला. आज प्रत्येक कॉलनीत दांडिया खेळला जातो; पण पारंपरिक गरबा चारच ठिकाणी खेळण्यात येतो.
सार्वजनिक गरब्याची परंपरा ५५ वर्षांची
By admin | Updated: September 28, 2014 00:17 IST