विशाल सोनटक्के, उस्मानाबाद दलित, शोषित, कष्टकरी समाजही आपल्यासारखाच माणूस आहे. मग या माणसांना त्यांच्या मुलभूत सुविधांपासून आपण कसे काय वंचित ठेऊ शकतो? देशाची, समाजाची सर्वांगिण प्रगती व्हायची असेल तर सर्वांना शिक्षण, समानसंधी मिळाली पाहिजे, एखादा विशीष्ठ वर्ग विकासापासून, मूलभूत हक्कापासून वंचीत ठेवून समाजाची, देशाची खर्या अर्थाने प्रगती होणार नाही, या विचाराने हरिभाऊ तोरणे यांनी दलित वस्त्यांमध्ये शिक्षण पोहोचविले. एवढेच नव्हे तर या परिसरातून जातीभेद कायमचा नष्ट व्हावा, जातीच्या पलिकडे जाऊन माणसामाणसात माणुसकीचे नाते निर्माण व्हावे, यासाठी झटणार्या हरिभाऊंनी आग्रह करून डॉ. बाबासाहेबांना वतनदार परिषदेसाठी तडवळ्यात आणले. हरिभाऊंच्या या सोशल इंजिनिअरींगला यंदा १०० वर्षे होत आहेत. भारतात १८१३ सालापर्यंत ब्राह्मणेत्तर लोकांना शिक्षण घेण्याची बंदी होती. १८५६ साली धारवाड येथे एका दलित विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश नाकारण्यात आला. हे प्रकरण तेव्हा चांगलेच गाजले. सरकारी खर्चाने चालविल्या जाणार्या शाळांमध्ये विशिष्ट समाजाला शिक्षणाचा अधिकार का नाही? हा विषय ऐरणीवर आल्यानंतर इंग्रज सरकारने ही बंदी उठवून सर्व जातींना शिक्षणाचा अधिकार बहाल केला. मात्र तरीही दलित समाजासाठी शिक्षण घेणे म्हणजे दिव्यच होते. मागासवर्गीय, दलित समाजाला शिक्षण मिळावे, या हेतूने इंग्रज सरकारने १९१४ साली खास अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी ‘लो-काष्ट स्कूल’ची स्थापना केली. आणि काही दिवसातच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, वैराग, पांगरी तसेच कसबे तडवळे येथे या शाळा सुरू झाल्या. तडवळे येथील याच शाळेवर हरिभाऊ तोरणे या ब्राह्मण शिक्षकाची नियुक्ती झाली. तोरणे गुरुजी विद्ववान तेवढेच परिवर्तनवादी विचारांचे होते. गुरुजींनी गावात शाळा सुरू केली मात्र दलित मागासवर्गीय समाजातील एकही विद्यार्थी या शाळेत आला नाही. सामाजिक रुढी परंपरांचा प्रचंड पगडा असल्याने शाळेकडे येण्यासही कोणी धजावत नव्हता. मात्र गुरुजींनी हार मानली नाही. त्यांनी थेट दलितवस्तीमध्ये जाऊन वर्ग घेण्यास सुरुवात केली. यावेळी आगरकरांचे शिष्य केशवराव देशपांडेही तडवळ्यात होते. देशपांडे आणि छत्रपती शाहु महाराजांच्या चळवळीतील कार्यकर्ते शंकरराव भाऊसाहेब निंबाळकर या दोघांनी तडवळ्यात समाज प्रबोधनाचे काम सुरू केले होते. गावातील गोविंद करंजकर, लक्ष्मण आबाजी होगले, विश्वनाथ रावजी करंजकर, यशवंत पिराजी करंजकर, रामा नामा उमप, रामा भगत, बिबन चाँद कोरबु, बाबूराव करंजकर यांच्यासह लोंढे, जमाले हे कार्यकर्त्यांचे त्यांना सहकार्य लाभत होते. हरिभाऊंच्या दलित वस्तीतील शाळेला या कार्यकर्त्यांनीच बळ दिले. हरिभाऊ शिक्षणाबरोबरच कीर्तनही करायचे. या कीर्तनाच्या माध्यमातून महात्मा फुले यांचे विचार त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले. एवढेच नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर्तमानपत्रातील अग्रलेख ते वस्तीमधील ग्रामस्थांना एकत्रित जमवून वाचून दाखवित असत. हरिभाऊ तोरणेंच्या या उपक्रमामुळे वाड्या-वस्त्यांवर जनजागृती झाली आणि दलित समाजातील एक मोठा वर्ग शिक्षणाकडे वळाला. त्यातूनच पुढे तोरणे गुरुजींच्या हाताखाली शिकलेले अर्जुन हरी भालेराव हे तडवळ्यातील दलित समाजातून पहिले शिक्षक झाले. पुढे त्यांचे शिष्य भगवान शिवाजी भालेराव शिक्षक झाले आणि तडवळ्यातील शिक्षणाची गंगा प्रवाहित झाली. १८६४ ला इंदू श्रीमंत पाटील व हौसा विश्वनाथ पाटील या मराठा समाजातील मुलींनी प्रथमच सातवी इयत्ता ओलांडून महिला शिक्षणातही आपण मागे नसल्याचे दाखवून दिले. तर भानुदास रामा जमाले व सुदाम रघुनाथ करंजकर हे याच बॅचचे विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी तडवळ्याबाहेर पडले. तोरणे गुरुजींनी जातीच्या पलिकडे जाऊन समाजातील सर्व घटकाला शिक्षण मिळाले पाहिजे, या उदात्त हेतूने संघर्ष केला. म्हणूनच शिक्षणाच्या बाबतीत कसबे तडवळ्याने भरारी घेतली. ब्राह्मण समाजातील असलेल्या हरिभाऊ तोरणे गुरुजींच्या या सोशल इंजिनिअरींग उपक्रमाला यंदा १०० वर्षे होत आहेत. शंभर वर्षापूर्वी ब्राम्हण समाजातील तोरणे गुरुजी दलित समाजाने शिक्षणाच्या प्रवाहात यावे यासाठी अनेकांचा विरोध पत्करुन संघर्ष करतात. एवढ्यावरच न थांबता वाड्या-वस्त्यावर जावून जनजागृती करतात, डॉ. बाबासाहेबांना तडवळ्यात आणण्यासाठी पुढाकार घेतात ही बाब ही केवळ तडवळा वासियांसाठीच नव्हे तर जिल्हावासियांसाठीही अभिमानाची बाब आहे. हरिभाऊ तोरणे यांनी अस्पृश्य समाजात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. ब्राह्मण समाजातील तोरणे गुरुजी अत्यंतिक तळमळीने विद्यार्थ्यांना शिकवित. याबरोबरच दलित, शोषित समाजातील नागरिकांना एकत्रित आणून त्यांना डॉ. बाबासाहेबांच्या वर्तमानपत्रातील अग्रलेख वाचून दाखवित. तोरणे गुरुजींनी सखाराम बोकेफोडे यांच्या सहकार्याने १९२४ सालीही बार्शी येथे बाबासाहेबांची मोठी सभा घेतली. समाजातील एक वर्ग विकासापासून, शिक्षणापासून वंचित ठेऊन देशाचे भले होणार नाही, असे ते सांगायचे. तोरणे गुरुजींच्या रचनेवर पुढे आंबेडकरी जलसे उभारले. हरिभाऊ तोरणे गुरुजी परिवर्तनवादी विचारांचे होते. १९२० साली ‘मूकनायक’ सुरू झाले. तेव्हापासून हरिभाऊ त्यात लिखाण करीत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशीही त्यांनी अनेकदा पत्रव्यवहार केला होता. सोलापूर जिल्हा व त्याकाळी मराठवाड्याची सरहद्द असलेल्या कसबे तडवळा येथे १९४१ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत वतनदार परिषद झाली. ही परिषद कसबे तडवळ्यात घ्यावी, अशी विनंतीही तोरणे गुरुजींनीच डॉ. आंबेडकरांकडे केली होती. या परिषदेने पुढे अभूतपूर्व क्रांती केली होती. गुरुजींच्या या कार्याला १०० वर्षे होत आहेत. ही बाब अभिमानास्पद असल्याचे येथील ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानेश्वर ढावरे यांनी सांगितले.
तोरणे गुरुजींच्या ‘सोशल इंजिनिअरींग’ची शंभरी
By admin | Updated: June 5, 2014 00:49 IST