उस्मानाबाद : जिल्हा पोलीस दलाच्या अस्थापनेवरील १४० पोलीस शिपाई पदांसाठी ४ हजार ६८१ अर्ज दाखल झाले आहेत. या भरती प्रक्रियेला ६ जून पासून प्रारंभ होत आहे. प्रतिदिन साडेसातशे उमेदवारांना या प्रक्रियेसाठी बोलाविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. १४० पोलीस शिपाई पदासाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार ४ हजार ६८१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यानुसार प्रशासनाने भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ६ जून पासून या प्रक्रियेला प्रारंभ होत असून, ही प्रक्रिया ११ जून पर्यंत चालणार आहे. पोलीस कवायत मैदानावर ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. त्यामुळे १०० मिटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. सदरील परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास मनाई केली आहे. उमेदवार अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल, असे कृत्य करता येणार नाही. त्याचप्रमाणे उमेदवारांना मोबाईल फोन, सेल्युलर फोन, फॅक्स व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई आहे. भरतीसाठी उमेदवारांशिवाय इतर व्यक्तींना पोलीस कवायत मैदानात प्रवेश दिला जाणार नाही. (भरतीसाठी नेमण्यात आलेले कर्मचारी वगळता). त्याचप्रमाणे शंभर मिटरच्या आवारात उमेदवार वगळता इतर पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हे प्रतिबंधात्मक आदेश ६ ते १५ जून या कालावधीत लागू राहतील. या आदेशाची पायमल्ली करणार्याविरुद्ध भारतीय दंड विधानचे कलम १८८ नुसार फौजदारी गुन्हा नोंदविला जाणार आहे. (प्रतिनिधी) सकाळी ६ ते १० या वेळेतच प्रवेश उमेदवारांना भरतीच्या मैदानात सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर येणार्या उमेदवारांना मात्र प्रवेश दिला जाणार नाही. याची उमेदवारांनी दखल घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मैदानात प्रवेश देताना संबंधित उमेदवाराकडे प्रवेशपत्र असणे बंधनकारक आहे.
दररोज साडेसातशे उमेदवारांची ‘चाचणी’
By admin | Updated: June 5, 2014 00:48 IST