परभणी: परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीची निवड करण्यासाठी २२ जुलै रोजी विशेष सभा होणार होती. आपणास या सभेची पूर्वसूचना न मिळाल्याचा आक्षेप संचालक श्रीधर देशमुख यांनी घेतल्याने ही सभा तहकूब करण्यात आली आहे.खासदार म्हणून निवडून आल्यामुळे संजय जाधव यांनी परभणी बाजार समिती सभापतीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या सभापतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन उद्या २२ रोजी संचालकांची बैठक बोलाविली होती.या सभेत होणाऱ्या सभापती निवडीची नोटीस आपणास मिळाली नाही, असा आक्षेप संचालक श्रीधर देशमुख यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे नोंदविला होता. हा आक्षेप सादर करुन देशमुख यांनी उद्याची ही सभा तहकूब करावी, असा अर्ज दिला होता. या अर्जानुसार २१ जुलै रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात या संदर्भात सुनावणी झाली. फळ प्रक्रिया संस्थेतून श्रीधर देशमुख हे बाजार समितीवर संचालक म्हणून निवडून आले आहेत. चर्चेत सहभागी होऊन मतदानाचाही अधिकार मिळावा, यापूर्वी तसा अधिकार दिला होता, याचे दाखले देत श्रीधर देशमुख यांनी आपली बाजू अॅड. सुजित देशमुख यांच्यामार्फत मांडली होती. या सुनावणीनंतर अर्जदार श्रीधर देशमुख यांना सभापती निवडीच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी आणि चर्चेत भाग घेण्याकरिता संधी मिळावी म्हणून उद्या होणारी सभापती निवडीची सभा पुढील आदेशापर्यंत तहकूब करण्यात येत असल्याचे जिल्हा उपनिबंधकांनी कळविले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
परभणी बाजार समिती सभापती निवडीची आजची सभा तहकूब
By admin | Updated: July 22, 2014 00:17 IST