परभणी : शहर मनपाअंतर्गत विविध योजनांतून करावयाच्या विकास कामांसाठी आलेला १६ कोटी रुपयांचा निधी अजूनही वापरला गेला नाही. त्यामुळे मागासवर्गीयांची विकासकामे ठप्प झाली आहेत.शहर विकासासाठी महानगरपालिकेला वेगवेगळ्या योजनांतून निधी प्राप्त होतो. दलित विकासासाठी १६ कोटींंचा निधी प्राप्त झाला. परंतु, मनपाच्या उदासीनतेमुळे कामे झाली नाहीत. यासंदर्भात शिवसेनेचे सुशील कांबळे यांनी मनपा आयुक्तांना निवेदन देऊन ही कामे रखडल्याची माहिती दिली आहे. पाणीपुरवठा योजनेअंतर्गत २०११-१२ मध्ये राखीव प्रभागात जलवाहिनी करण्यासाठी ३० लाख रुपये तर २०१२-१३ मध्ये याच कामांसाठी ३० लाख रुपये असा ६० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.त्याचप्रमाणे दलितवस्ती पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत वैयक्तिक शौचालय व नळ जोडणीसाठी अडीच वर्षाखाली सर्वेक्षण करुन लाभार्थ्यांची निवड केली होती. यासाठी साडेसात कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. परंतु, मनपाच्या उदासीनतेमुळे लाभार्थ्यांना धनादेश मिळाले नाहीत व हजारो लाभार्थी शौचालय योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. रमाई घरकुल योजनेसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे. परंतु, दोन वर्षापासून फाईली त्रुटीत ठेवण्यात आल्या. या फाईली निकाली न काढता लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक चालविलेली आहे. मनपाला यासंदर्भात शिवसेनेने वेळोवेळी निवेदने दिली. परंतु, मनपातर्फे प्रतिसाद दिलेला नाही. (प्रतिनिधी)‘अधिकाऱ्यांवर कारवाई करा’ रमाई घरकुल योजनेमध्ये लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करण्यात आली. पैसे व इतर कारणास्तव घरकुलाच्या फाईली त्रुटीत काढण्यात आल्या.त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी व फाईल्स निकाली काढाव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.शिवसेनेने दिला आंदोलनाचा इशारा शिवसेनेचे सुशील कांबळे यांनी मनपाला निवेदन देऊन कामे करण्याची मागणी केली आहे. मागासवर्गीयांची १६ कोटी रुपयांची कामे केवळ उदासीनतेमुळे झालेली नाहीत. ही कामे त्वरित पूर्ण करावीत व निधी वाटप करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा सुशील कांबळे यांनी दिला आहे.
तब्बल १६ कोटींचा निधी थकला
By admin | Updated: August 4, 2014 00:47 IST