रामेश्वर काकडे, नांदेड सर्व गावे २०१९ पर्यंत टंचाईमुक्त करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचा निधी मार्चअखेर खर्च करावयाचा होता. परंतु निविदा प्रक्रियेला विलंब झाल्यामुळे कोट्यावधी रुपयांचा निधी पडून असून उपलब्ध निधी खर्च करण्यास जूनअखेरपर्यंत मुदतवाढ दिल्यामुळे अपूर्ण कामे पूर्ण होणार आहेत.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात २०१५-१६ या वर्षासाठी १५ हजार ४८९ कामांचे उद्दिष्ट प्रस्तावित होते. त्यासाठी २८६ कोटी ७३ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. प्रस्तावित केलेल्या कामावर उपलब्ध निधी मार्चअखेर खर्च करणे अपेक्षीत होते. मात्र कामे करण्यासाठी आॅनलाईन टेंडर प्रक्रिया जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत सुरु राहिल्याने ई-टेंडरींग प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विलंब झाला. त्याचा परिणाम प्रस्तावित केलेली कामे तसेच उपलब्ध करुन देण्यात आलेला निधी मार्चअखेरपर्यंत खर्च करता आला नाही, त्यासाठी जलयुक्तची गतवर्षातील सर्व कामे पूर्ण करता यावी, यासाठी आता जून २०१६ पर्यंत म्हणजे तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक अपूर्ण कामे पूर्ण करता येतील. मात्र प्रशासकीय यंत्रणेने कामांची गती वाढविणेही आवश्यक झाले आहे.२०१५ - २०१६ साठी एकूण १५ हजार ४८९ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. परंतु त्यापैकी मार्चपर्यंत ५२६३ ऐवढीच कामे पूर्ण झालेली आहेत. २८६ कोटी ७३ लाख निधीपैकी केवळ ५३ कोटी ६९ लाख रुपये खर्च झाले आहेत. पहिल्या टप्यात जिल्ह्यातील २६१ गावांची निवड करण्यात आली होती. त्यासाठी पहिल्या टप्यात ४० कोटी १४ लाखांचा विशेष निधी तर दुसऱ्या टप्यात २७ कोटी ८ लाख असा एकूण ६७ कोटी २२ लाख रुपयांच्या विशेष निधीची तरतुद करण्यात आली होती. मात्र विशेष निधीपैकी केवळ २६ कोटी ३ लाख रुपये खर्च करण्यात आले असून उर्वरित विशेष तसेच इतर वेगवेगळ््या योजनातून प्राप्त झालेला निधी अद्यापही शिल्लक आहे.दुसऱ्या टप्यात २२६ गावांची निवड- जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१६-१७ या वर्षात जिल्ह्यातील २२६ गावे निवडली आहेत. सदर गावात अभियान राबविण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम चालू आहे. राज्यासाठी जवळपास १ हजार कोटी रुपयांचा तर नांदेड जिल्ह्यासाठी ४३ कोटी ६ लाख रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. दुसऱ्या टप्यात निवडलेल्या गावात येत्या महिनाभरानंतर जलयुक्तची विविध कामे सुरु करण्यात येतील, असे सांगण्यात आले.२०१५ ते २०१९ पर्यंत सर्व गावे टंचाईमुक्त करण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्यातील निवडलेल्या काही गावात कामे पूर्णत्वास गेली आहेत. परंतु अनेक गावात शंभर टक्के कामे पूर्ण झाली नाहीत. जलयुक्त शिवार अभियानातंर्गत शेततळे, ठिबक, विहिर बोअर पूनर्भरण, नाला खोलीकरण, सिमेंट नालाबांध, माती नालाबांध, अर्दन स्ट्रक्चर, गाळ काढणे, पाझर तलाव, तलाव दुरुस्ती आदी विविध कामे करण्यात येत आहेत.
जलयुक्तच्या निधी खर्चास तीन महिन्यांची मुदतवाढ
By admin | Updated: April 8, 2016 00:04 IST