उस्मानाबाद : जिल्ह्यात २००५-०८, २००९-१० व २०११ मध्ये राबविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत चौकशी समितीने तब्बल ४४ हजार ९३१ शिधापत्रिका अपात्र ठरविल्या होत्या. परंतु, यातील ८२९ शिधापत्रिका अपात्र नसल्याचा अहवाल पुन्हा विभागीय आयुक्तांनी दिला होता. या अहवालानुसार आता नागपूर विभागीय आयुक्तांकडून सदरील ८२९ शिधापत्रिकांची फेरचौकशी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकेचा आढावा घेण्यासाठी शासनाच्या वतीने विशेष मोहिम राबविण्यात आली होती. या तपासणीदरम्यान जिल्ह्यातील तब्बल ४४ हजार ९३१ शिधापत्रिका अपात्र ठरविण्यात आल्या होत्या. त्यात एपीएलच्या २८ हजार ४६२, बीपीएल ११ हजार २१७, अंत्योदय ३ हजार २१३, अन्नपुर्णा ५२३ तर शुभ्र १ हजार ५२३ अशा शिधापत्रिकांचा समावेश होता. दरम्यान, यानंतर अपात्र शिधापत्रिकाधारकांनी पुन्हा नव्याने अर्ज करुन विविध पुरावे सादर केल्यानंतर प्रशासनाच्या वतीने एपीएल ५५८, बीपीएल १९०, अंत्योदय ८१ अशा ८२९ शिधापत्रिका पुन्हा चालू करण्यात आल्या.याच शिधापत्रिकांची फेरतपासणी करून स्वयंस्पष्ट अहवाल शिफारशीसह शासनास सादर करावा, असे आदेश राज्य शासनाच्या वतीने विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत. या आदेशानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी नागपूर येथील विभागीय आयुक्त येणार असून, ते संबंधित तहसील कार्यालयात जाऊन शिधापत्रिकांची तपासणी करणार असल्याचेही जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
‘त्या’ ८२९ शिधापत्रिकांची होणार पुन्हा चौकशी
By admin | Updated: August 20, 2014 01:50 IST